कुंदन परदेशी, राकेश कोष्टीनेच केला ज्वाल्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

नाशिक - पंचवटीतील सराईत गुन्हेगाराचे दीड वर्षापूर्वी अपहरण करून त्याचा जिवंत जाळून खून केल्याच्या घटनेची अखेर उकल झाली. आज पंचवटी पोलिसांनी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहातून मुख्य संशयित राकेश कोष्टी व कुंदन परदेशी यांना या प्रकरणी अटक केली आहे. खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव ज्वाल्या ऊर्फ जालिंदर अंबादास उगलमुगले (रा. वाघाडी) असे आहे.

नाशिक - पंचवटीतील सराईत गुन्हेगाराचे दीड वर्षापूर्वी अपहरण करून त्याचा जिवंत जाळून खून केल्याच्या घटनेची अखेर उकल झाली. आज पंचवटी पोलिसांनी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहातून मुख्य संशयित राकेश कोष्टी व कुंदन परदेशी यांना या प्रकरणी अटक केली आहे. खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव ज्वाल्या ऊर्फ जालिंदर अंबादास उगलमुगले (रा. वाघाडी) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्‍टोबर 2015 ला रात्री नऊच्या सुमारास पंचवटीतील ज्वाल्या ऊर्फ जालिंदर अंबादास उगलमुगले याला संशयित अविनाश कौलकर व रोहित कडाळे (दोघेही रा. वाघाडी, पंचवटी) कामानिमित्त सोबत घेऊन गेले. टाकळी परिसरात तिघांनी मद्यपान केले. या ठिकाणी सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, कुंदन परदेशी व श्‍याम महाजन आले. त्यांनी ज्वाल्याकडे आपल्यासाठी काम करावे, असा आग्रह धरला. त्यासाठी ज्वाल्याने त्यास नकार दिल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. अखेर ज्वाल्याला आणखी दारू पाजून बळजबरीने इगतपुरीतील उभाडे येथील निर्जनस्थळी नेऊन कुंदन परदेशी, राकेश कोष्टी, श्‍याम महाजन व त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली आणि अंगावर पेट्रोल टाकून त्यास जिवंत पेटवून दिले. या प्रकरणी इगतपुरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती, परंतु पंचवटी पोलिसांत ज्वाल्या बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल होती. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी पुरता माग काढत अखेर 20 महिन्यांनी त्याची उकल केली.

पाथरवट लेनमधील राड्यातून अशी झाली उकल
दोन आठवड्यांपूर्वी पंचवटीतील पाथरवट लेनमध्ये रात्रीच्या सुमारास 20-25 जणांच्या टोळक्‍याने तलवारींच्या सहाय्याने दहशत माजविल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणात पंचवटी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित अविनाश कौलकर, रोहित कडाळे यांची कसून चौकशी केली. त्यात त्यांनी 20 महिन्यांपूर्वी केलेल्या ज्वाल्याच्या खुनाची कबुली दिली. त्यातून संशयित कुंदन परदेशी, राकेश कोष्टी व श्‍याम महाजन यांची नावे समोर आली. श्‍याम महाजन याने पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार, मध्यवर्ती कारागृहात असलेले परदेशी व कोष्टी यांना पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले.

एका राजकीय नेत्याचा संबंध?
पूर्वाश्रमीचा एक सराईत गुन्हेगार व एका प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर पोलिसांचा दाट संशय आहे. पाथरवट लेनमधील राड्याप्रकरणीही पोलिसांनी त्याला नोटीस बजावली होती. त्याचप्रमाणे ज्वाल्या याच्याशीही त्यांचे पूर्ववैमनस्य असल्याची चर्चा असल्याने त्यांनीच कोष्टी- परदेशीचा वापर करून ज्वाल्याचा काटा काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिस आयुक्तांनी केले कौतुक
वीस महिन्यांपूर्वी झालेल्या या खुनाचा तपास करणाऱ्या पंचवटी पोलिसांच्या तपास पथकाचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी कौतुक केले आहे. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) आनंदा वाघ, तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र म्हात्रे, हवालदार प्रवीण कोकाटे, भास्कर गवळी, सुरेश नरवडे, सचिन म्हसदे, महेश साळुंखे, प्रभाकर पवार, संजय पाटील, जितेंद्र जाधव, भूषण रायते, संदीप शेळके, संतोष काकड, उत्तम खरपडे आदींनी ही कामगिरी बजावली.

Web Title: nashik news jwala murder by kundan & rakesh