कलानगरच्या ‘आनंदसागर’चे तीन तेरा

कलानगरच्या ‘आनंदसागर’चे तीन तेरा

नाशिक - मेरी- दिंडोरी रस्त्यावरील कलानगरमधील आनंदसागर उद्यानाचे तीन तेरा वाजले असून, या दुरवस्थेला महापौर रंजना भानसी यांच्यासह स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. उद्यानात सर्वत्र गवत वाढले आहे. खेळणी तसेच पेव्हरब्लॉकची दुरवस्था झाली आहे. फांद्याही तोडायला कुणाला वेळ नाही. वारंवार प्रत्यक्ष भेटून, निवेदन देऊनही उद्यानाची सुधारणा करण्याचे नाव कुणी घेत नाही. महापौर, नगरसेवक आपल्याच कामात मश्‍गुल असल्याने त्यांना उद्यानाकडे पाहण्यास वेळ नसल्याने स्थानिकांत नाराजीचा सूर आहे. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून पोकार कॉलनी, कलानगरच्या मध्यवस्तीत दीड एकरात स्थानिकांच्या सोयीसाठी ‘आनंदसागर’ हे उद्यान जवळपास एक कोटी रुपये खर्चून माजी नगरसेवक गणेश चव्हाण यांनी उभारले. राज ठाकरे यांनी पाहणी केल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार हे उद्यान दोन भागांत लॉन (हिरवळ, गवत) लावत विभागण्यात आले. एका बाजूला मुलांना खेळण्यासाठी फायबरची खेळणी, तर दुसऱ्या बाजूला आलेल्या कुटुंबासह बसून गप्पा मारण्यासाठी ठेवण्यात आला. या जोडीलाच बाजूला फिरणाऱ्यांसाठी पेव्हरब्लॉक बसविण्यात येऊन अर्धा किलोमीटरचा ट्रक तयार केला. त्या जोडीला एलईडी दिवे, सुमधूर संगीताची मेजवानी देणारे ‘एफएम’ची व्यवस्था करण्यात आली. मध्यभागी असलेला आकर्षक कारंजाही लक्ष वेधून घेत होता. मात्र, उद्यानाचे हे नवेपण ‘नव्याचे नऊ दिवस’ याप्रमाणे सुरवातीचे काही महिने व्यवस्थित राहिले. त्यानंतर त्याची दुरवस्था सुरू झाली. आजमितीस उद्यानाचे तीन तेरा वाजले आहेत.

साफसफाईची जबाबदारी कुणाची?
महापौर व नगरसेवक याच परिसरात राहतात. मात्र, उद्यानाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. कदाचित मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे उद्यान उभारल्याने त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे की काय, असाही संशय व्यक्त होत आहे. उद्यानाच्या देखभालीसाठी सुरक्षारक्षक आहे. मात्र, सकाळी उद्यान उघडणे आणि रात्री बंद करण्याव्यतिरिक्त काहीच काम तो करत नाही. साफसफाईचे काम दुसऱ्याचे आहे. महापालिका पाहील, असे उत्तर मिळते. उद्यानाबाबत सारेच जबाबदारी झटकताना दिसतात.

सर्वत्र कचऱ्याचे ढीग, अस्वच्छतेचे दर्शन
या उद्यानाची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. उद्यान परिसरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, पडलेल्या फांद्या, फुले सर्वत्र दिसते. दोन्ही भागात वाढलेले गवत व झाडांच्या अस्ताव्यस्त फांद्यांमुळे अस्वच्छता आहे. ग्रीन जिमचे साहित्य तुटले असून, फायबरचे प्राणी असलेल्या मगर, वाघ, सिंह, बिबट्याच्या भागात गवत वाढले आहे. पेव्हरब्लॉकचा ट्रॅकबद्दल तर कुणी बोलायलाच नको. आधीच कमी-जास्त बसविण्यात आलेले पेव्हरब्लॉक काही भागात उखडले आहेत. उद्यानात सकाळी व सायंकाळी दोनशेच्या आसपास स्थानिक नागरिक फिरणे, व्यायामासाठी येतात. मात्र दुरवस्थेमुळे त्यांना चालणे, व्यायाम करणे अवघड होऊन बसले आहे.

बंद कारंजा, एलईडी, एफएमही
उद्यानातील कारंजा, जॉगिंग ट्रॅकवरील एलईडी, लेझर आणि एफएम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. कारंजा सुरू असलेला दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी स्थानिकांनी जणू योजनाच जाहीर केली आहे. कारंजाचे पाणी बदलले जात नाही. एलईडी दिवे आणि एफएमही फक्त नावालाच राहिले आहे. उद्यानात ज्येष्ठही फिरण्यासाठी येतात. गेल्या महिन्यात ट्रॅकवर साचलेली फुले, पालापाचोळा व पाण्यामुळे दोन-तीन ज्येष्ठ नागरिक पाय घसरून पडल्याची घटनाही घडली होती. गवत व झुडपे वाढलेले असल्याने साप, पाली व सरड्यांचा वावरही उद्यानात वाढला आहे.  

आनंदसागर कलानगरचे एकमेव सुस्थितीतील उद्यान आहे. मात्र, त्याच्या देखभाल- दुरुस्तीकडे महापालिकेचा उद्यान विभाग लक्ष देत नाही. एक ते दीड कोटी रुपये खर्चून उद्यान उभारल्याने त्याची नियमित गवतकटाई, पालपाचोळा साफ करणे अपेक्षित आहे. स्थानिकांनी उद्यानाबद्दल केलेल्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न आहे. 
- गणेश चव्हाण, माजी नगरसेवक

आनंदसागर उद्यानात सकाळ- सायंकाळी स्थानिकांची फिरणे, व्यायामासाठी गर्दी असते. उद्यानातील एफएम, एलईडी यंत्रणा बंद आहे. पावसामुळे पेव्हरब्लॉक दबले गेले. कारंजाचीही दुरवस्था झाली आहे. ग्रीन जिमचा सेट सुधारण्याची गरज असून, महापौरांनी लक्ष घातल्यास काम गतीने होईल. 
- सुनील निरगुडे, अध्यक्ष, सिद्धिविनायक गणपती मंदिर, पोकार कॉलनी

मध्यवस्तीतील हे उद्यान सुरवातीचे काही दिवस चांगले होते. मात्र, आता पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. थंडीचे दिवस असल्याने आता व्यायामप्रेमींची संख्या वाढत आहे. वारंवार सुधारणेची मागणी करूनही नगरसेवकांकडून दुर्लक्ष होते. याठिकाणी कायमस्वरूपी देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने यंत्रणा नेमावी. या भागातील एक चांगले उद्यान असल्याने त्याचे वैभव कायम ठेवावे. त्यासाठी स्वतंत्र नियोजन व्हायला हवे.
- कैलास जागिंड (शर्मा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com