राणे, राय, सुखरामला घेणाराच खरा भाजप - कन्हैयाकुमार

नाशिक - संविधान जागर सभेत रविवारी डफावर थाप देत आजादीचे गीत सादर करताना कन्हैयाकुमार.
नाशिक - संविधान जागर सभेत रविवारी डफावर थाप देत आजादीचे गीत सादर करताना कन्हैयाकुमार.

नाशिक - एकाही भ्रष्टाचारी नेत्याला सोडणार नाही, असे नरेंद्र मोदी म्हणायचे. पण आता मुकुल राय, सुखराम, त्यांचा मुलगा अशा एकेक भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये राष्ट्रकार्यासाठी घेतले जात आहे. हाच खरा मोदींचा भाजप आहे, असा हल्ला दिल्लीच्या जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने रविवारी येथे चढवला.

तुम्हाला पोट धरून हसायचंय काय? मग तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आताचे आणि गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचे भाषण जरूर ऐका, असे सांगत कन्हैयाकुमारने श्री. मोदींवर टीकास्त्र सोडले.

संविधान जागर सभेतर्फे तुपसाखरे लॉन्सवर झालेल्या कार्यक्रमात तो ‘भारतीय विद्यार्थी-युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर बोलत होता. सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा गांगोडे अध्यक्षस्थानी होत्या. मिलिंद सावंत, प्रशांत निमसे, ॲड. राजपाल शिंदे, प्रिया इंगळे, विशाल रणमाळे, विनय कटारे, चेतन गांगुर्डे, विराज देवांग, दत्ता ढगे, स्वाती पाटील आदी उपस्थित होते.

मला मराठी समजते, असे म्हणत कन्हैयाकुमारने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे म्हणताच उपस्थितांनी ‘विजय असो’ असा जयघोष केला. परिचयामध्ये पदवी प्रथम श्रेणीमध्ये घेतल्याची माहिती देण्यात आल्याचा धागा पकडून त्याने, पदवी लपवून ठेवणारा मी मोदी अथवा स्मृती इराणी नाही, असे सांगत पदवी दुसऱ्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो असल्याचे स्पष्ट केले. डावे आणि आंबेडकरवादी यांच्यात मैत्री होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. हरकत नाही. मात्र आत्मसन्मानासाठी जनता ‘लाल सलाम’ आणि ‘जयभीम’ म्हणेल. जनतेला सांस्कृतिक एकतेत समानता हवी आहे, असे सांगून कन्हैयाकुमार म्हणाला, ‘‘वर्तमानात मंदिर कुठे बनवायचे, ताजमहाल काय आहे, असे प्रश्‍न नाहीत. खऱ्या प्रश्‍नांमध्ये रोहित वेमुल्लाच्या आईला न्याय का मिळत नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत, महिलांवरील अत्याचार का रोखले जात नाहीत, देशवासीयांच्या विरोधात धोरणे का स्वीकारली जात आहेत, रामाऐवजी नथुरामाचे मंदिर का उभारले जात आहे, मोदींमुळे अंबानी पुन्हा सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत कसे येतात, हे प्रश्‍न आहेत. त्याविरुद्धच्या संघर्षासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.’’ अध्यक्षा गांगोडे यांचे भाषण झाले. प्रियाने सरनाम्याचे वाचन केले. चेतनने प्रास्ताविक केले. राजू देसले यांनी स्वागत केले. किरण मोरे यांनी आभार मानले.

क्रांतिगीते आणि डफावर थाप
सभास्थळी शाहीर संभाजी भगत यांनी क्रांतिगीते सादर केली. त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गीत सादर करताना उपस्थितांना ठेका धरायला लावला, तर स्वतः कन्हैयाकुमारनेही तब्बल तासभराच्या भाषणानंतर डफावर थाप देत त्वेषपूर्ण आवाजात आजादीचे गीत सादर केले. 

कन्हैयाकुमार कडाडला...
     हाफ चड्डी तुम्ही घालणार, दांडके हातात तुम्ही फिरवणार अन्‌ नारायण राणे मंत्री होणार हे पक्के ध्यानात ठेवा.
     मला देशद्रोही म्हणणाऱ्यांनी गॅस भाववाढ, भाजपमध्ये घेतल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत दाखवावी.
     माझ्यावर देशद्रोहाचा आरोप केला जातो. मात्र, राजकीय विरोधक म्हणूनही अद्यापपर्यंत आरोपपत्र दाखल होत नाही.
     उच्च-कनिष्ठ दरीच्या विरोधात बोलणाऱ्यांचे तोंड बंद केले जाते.
     माणुसकीची समज देणाऱ्या शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुका बंद करण्यात आल्या.
     नोटाबंदीनंतर प्रश्‍न उपस्थित करणाऱ्यांना चोर म्हटले गेले. मग विजय मल्ल्याला सदाचारी म्हणायचे काय?
     तीन लाख कोटी काळ्या पैशांबद्दल पंतप्रधान बोलतात. मग जपानकडून बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटींचे कर्ज कशाला?
     गॅसची सबसिडी परत करा म्हटले जाते; पण भांडवलदारांना ‘बेल आउट पॅकेज’ मागू नका म्हणण्याची हिंमत का नाही?
     शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला, गरिबांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची काळजी घ्यायला सरकारकडे पैसे नाहीत.

पुणेकरकडून गोंधळाचा प्रयत्न
कन्हैयाकुमार वर्तमानातील प्रश्‍नांबद्दल बोलत असताना डोमलगत हिरवळीवर उभे राहून संतोष पुणेकर (वय २८, रा. सातपूर) याने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलिस ठाण्यात चौकशी करून सोडून दिले. पोलिस त्याच्याबद्दल माहिती घेणार आहेत. दरम्यान, कन्हैयाकुमारच्या सभेसाठी तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. लॉनमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात होती. काळ्या रंगाचा सदरा अथवा टी-शर्ट परिधान केलेल्यांना ते काढून बनियनवर प्रवेश घ्यावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com