मागतो संवाद आता, टाळतो मी वाद आता...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

नाशिक - शेतकरी आत्महत्या, सरकारी धोरणे, जागतिकीकरण, भ्रष्टाचार, बलात्कार, नोटाबंदी, शेतकरी तसेच कष्टकरी वर्गाच्या वेदनांवर आपल्या कवितांतून भाष्य करत उपस्थित कवींनी रसिकांची मने जिंकली. रवींद्र कांबळे यांच्या ‘मागतो संवाद आता’सारख्या कवितांनी रसिकांना अंतर्मुख केले.

नाशिक - शेतकरी आत्महत्या, सरकारी धोरणे, जागतिकीकरण, भ्रष्टाचार, बलात्कार, नोटाबंदी, शेतकरी तसेच कष्टकरी वर्गाच्या वेदनांवर आपल्या कवितांतून भाष्य करत उपस्थित कवींनी रसिकांची मने जिंकली. रवींद्र कांबळे यांच्या ‘मागतो संवाद आता’सारख्या कवितांनी रसिकांना अंतर्मुख केले.

परशुराम साइखेडकर नाट्यगृहात कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयातर्फे ‘तरी आम्ही बोलू नये?’ हे काव्यसंमेलन घेण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना आकाश सोनवणे यांची होती. संमेलनात अंकुश आरेकर, आकाश सोनवणे, भीमराव कोते पाटील, राजेंद्र राठोड, सागर काकडे, रवींद्र कांबळे, नितीन चंदनशिवे, जित्या जाली, दीप पारधे, सुमीत गुणवंत, हृदयमानव अशोक, गुरुनाथ साठेलकर आणि कवयित्री रमणी यांनी आपल्या कविता  सादर केल्या.

कवी भीमराव कोते पाटील यांनी ‘तुमची श्रद्धा आहे देवावर, तुम्ही ती चार भिंतीच्या आत ठेवता, तुम्ही धर्माचे, जातीचे जोडे बाजूला काढून, एक माणूस म्हणून वावरता’ ही कविता सादर करत पुरोगामित्वावर भाष्य केले. अंकुश आरेकर यांनी ‘हिरवा आभास’ ही कविता सादर केली. ‘चित्रकलेच्या सरांनी शेतशिवाराचं हिरवं चित्र काढायला सांगितलंय पोरांना, आणि सर मात्र बाहेर जाऊन हिरवाच रंग शोधत बसले कुंडीतल्या पिवळ्या रोपट्यात,’ असे म्हणत त्याने दुष्काळाच्या दाहकतेवर भाष्य केले. नितीन चंदनशिवे यांनी ‘पांडुरंगा’ या कवितेतून शेतकऱ्यांच्या वेदना समर्पकपणे मांडल्या. सागर काकडे यांनी ‘देणं-घेणं’ या कवितेतून नोटाबंदीवर भाष्य केले. त्यात तो म्हणतो, ‘...की बैलासारखं सालानं पोटासाठी दुसऱ्याच्या बांधावर राबणाऱ्यांना काहीच नसतं देणंघेणं जागतिक मंदीचं आणि तुम्ही एका रात्रीत केलेल्या नोटाबंदीचं’... सर्वच कवितांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. काव्यसंमेलनाचे निवेदन कवयित्री रमणी  यांनी केले.

Web Title: nashik news kavi sammelan