काझीच्या गढीवरील भय संपत नाही...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

नाशिक - भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेल्या काझीच्या गढीचा एक-एक भाग जमीनदोस्त होत असताना काझीच्या गढीचे खरोखर संरक्षण होणार, की याठिकाणी माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार, असा सवाल वीस वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना पडला आहे. रहिवाशांच्या एका हातात घरपट्टी, तर दुसऱ्या हातात घर खाली करण्यासाठी नोटीस पडत असल्याने प्रशासनालाही नेमकी काय भूमिका घ्यावी, असा प्रश्‍न पडला आहे.

नाशिक - भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेल्या काझीच्या गढीचा एक-एक भाग जमीनदोस्त होत असताना काझीच्या गढीचे खरोखर संरक्षण होणार, की याठिकाणी माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार, असा सवाल वीस वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना पडला आहे. रहिवाशांच्या एका हातात घरपट्टी, तर दुसऱ्या हातात घर खाली करण्यासाठी नोटीस पडत असल्याने प्रशासनालाही नेमकी काय भूमिका घ्यावी, असा प्रश्‍न पडला आहे.

राज्यातील संरक्षित वास्तूंमध्ये गोदावरीच्या उजव्या किनाऱ्याजवळील काझीच्या गढीचा समावेश आहे. मात्र, गढीच्या संरक्षणासाठी पुरातत्त्व विभागासह महापालिका यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. १९९३ च्या मुसळधार पावसात गढीचा काही भाग प्रथमच कोसळला. त्यानंतर प्रत्येक पावसाळ्यात गढीचा थोडा थोडा भाग नदीच्या बाजूला कोसळून आता गढीचा अवघा ६० टक्के भाग शिल्लक आहे. नदीच्या बाजूला राहणारे रहिवासी अक्षरशः जीव मुठीत धरून राहतात. येथील शिल्लक राहिलेल्या घरांनाही मोठे तडे गेले असून, उर्वरित भाग कधीही कोसळू शकेल, अशी परिस्थिती उद्‌भवली आहे. मध्यंतरी संरक्षक भिंतीबाबत ‘मेरी’ने मातीपरीक्षणही केले होते; परंतु त्याचे पुढे काय झाले याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत. आता पावसाळ्याच्या तोंडावर रहिवाशांना घरपट्टीपाठोपाठ जागा खाली करण्यासाठी नोटिसाही देण्यात आल्या आहेत. मात्र, येथे वास्तव्यास असणारे बहुतांशी रहिवासी अल्पउत्पन्न गटातील असल्याने या परिस्थितीत कुठे स्थलांतरित व्हावे, असा प्रश्‍न पडला आहे.

लोकप्रतिनिधींकडूनही ठेंगाच
या भागातून दोन-तीन वेळा विजयी झालेल्या एका माजी नगरसेवकाकडून गढीच्या संरक्षक भिंतीचे गाजर दाखविण्यात आले. मात्र, त्याची कधीही पूर्तता झालेली नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. आता विद्यमान नगरसेवकांनी तरी या प्रश्‍नाची दखल घेऊन गढीच्या संरक्षक भिंतीसाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. महापालिकेकडून या प्रश्‍नाची सोडवणूक होत नसेल, तर राज्य शासनाने यात पुढाकार घेऊन संरक्षक भिंत बांधावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

गढीवर तीस वर्षांपासून राहतो. हातावरच पोट असल्याने अन्य ठिकाणी घर घेणेही शक्‍य नाही. त्यामुळे जीव मुठीत धरून येथेच राहतो. मात्र, पाऊस सुरू झाल्यावर मनातील धाकधूक वाढते.
- कल्पना सनानसे, रहिवासी

पन्नास वर्षांपासून कुटुंबासह येथे राहतो. दर वर्षी पावसाळ्यात गढीचा काही भाग कोसळतो. पूर्वी गढीच्या मध्यावर असलेली आमची घरे आता एका टोकावर असल्याने जीव मुठीत धरून राहावे लागते.
- लक्ष्मण चव्हाण, रहिवासी

येथून निवडून आलेल्या नगरसेवकांनी अनेक वेळा गढीच्या संरक्षक भिंतीबाबत आश्‍वासने दिली; परंतु त्याची कधीही पूर्तता झालेली नाही. याप्रश्‍नी लोकप्रतिनिधी रहिवाशांशी खोटे बोलतात.
- जयश्री भावसार

येथील रहिवाशांना घरपट्टी, पाणीपट्टीबरोबरच घरे खाली करण्यासाठी नोटिसाही देण्यात येत आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हातावर पोट असणाऱ्या आमच्यासारख्यांनी कोठे जावे?
- मीराबाई गुरव

घरात लहान मुले असून, आता घरापुढे केवळ फूटभर जागा शिल्लक राहिली आहे. त्यामुळे रात्री पाऊस सुरू झाल्यावर भीतीपोटी रात्र जागूनच काढावी लागते. अन्य ठिकाणी भाडेतत्त्वावर घर घेण्याचीही आर्थिक कुवत नाही.
- सोन्याबाई खैरनार

Web Title: nashik news Kazi gadhi