संयम पाळा, शांतता राखा - डॉ. सिंगल

नाशिक - कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी पोलिस आयुक्तालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल. समोर उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते.
नाशिक - कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी पोलिस आयुक्तालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल. समोर उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते.

नाशिक - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तालयात शांतता समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. उद्या (ता. ३) बंददरम्यान शांतता व संयम राखण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी या वेळी केले. 

आमदार सीमा हिरे यांच्यासह समितीचे सदस्य या वेळी उपस्थित होते. उद्या सकाळी दहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घटनेचा निषेध व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची भूमिका माजी महापौर अशोक दिवे यांनी या वेळी मांडली, तर रिपाइं (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्याची भूमिका विशद केली. 

आमदार सौ. हिरे यांनी घटनेची निंदा करून, शहरात शांतता राखण्यासाठी संयम पाळण्याचे आवाहन केले. आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले, की निषेध करण्यासाठी जमावाने न येता, आपले निवेदन जिल्हाधिकारी, पोलिसांकडे द्यावे. जमावातून अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

त्यामुळे वातावरण अधिक तणावपूर्ण होण्याचीही शक्‍यता असते. संयमी भूमिका घेऊन शांततेच्या मार्गाने बंद पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले. 
दरम्यान, शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, आजारपण वगळता, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून २० संशयितांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काहींच्या हालचालींवर पोलिस नजर ठेवून आहेत, अशी माहिती आयुक्तांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. 

कडेकोट बंदोबस्त
नाशिक शहरात पोलिस उपायुक्‍तांसह ३० पोलिस निरीक्षक, ८० उपनिरीक्षक आणि १५०० कर्मचारी, संबंधित पोलिस ठाण्यांचे पोलिस दल, होमगार्ड, राज्य राखीव दलाचे एक पथक, शीघ्रकृती दलांसह दंगानियंत्रण पथक असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फे जिल्हाभर सुमारे तीन हजार पोलिस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दलाचे एक पथक, शीघ्रकृती दल, दंगानियंत्रण पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे. मनमाड, येवला, मालेगाव, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी या संवेदनशील तालुक्‍यांमध्ये जादा कुमक रवाना करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी या वेळी सांगितले.

इंटरनेट सेवा बंदची शक्‍यता
कोरेगाव भीमा घटनेसंदर्भात सोशल मीडियावरून अफवा पसरविल्या जात आहेत. त्याची दखल पोलिस आयुक्तांनी घेतली असून, त्या संदर्भात सायबर पोलिसांमार्फत पेट्रोलिंग केले जात आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच अफवांचे प्रमाण वाढल्यास शहर-जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा पर्यायही खुला असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com