सिग्नलवर लेफ्ट टर्नला ‘नो एंट्री’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

नाशिक - शहरातील काही सिग्नलच्या ठिकाणी डाव्या बाजूकडे वळणारा सिग्नलच बंद करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर वाहतूक पोलिसही डाव्या बाजूला वळायचे असेल तर सिग्नल सुरू झाल्यानंतर सरळ जाऊनच डाव्या बाजूला वळा, अशा सूचना देतात. ‘नो एंट्री’बाबतच्या वाहतूक सिग्नलवरील या अभिनव प्रकारामुळे अनेक वाहनचालकांचे वाद सध्या होत आहेत. स्मार्टसिटीच्या धर्तीवर प्रायोगिक तत्त्वावर काही सिग्नलवर हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना सिग्नल यंत्रणेच्या नियमांचे पालन करण्याची शिस्त लागावी, असाच यामागे हेतू आहे. 

नाशिकचा स्मार्टसिटीत समावेश झाला. त्या दृष्टिकोनातून शहराची वाहतूक व्यवस्थाही तितकीच स्मार्ट व्हावी या हेतूने शहर वाहतूक पोलिस शाखा आणि वाहतुकीसंदर्भात कार्यरत असलेल्या नाशिक फर्स्ट या संस्थेतर्फे हा उपक्रम सुरू आहे. 

सिग्नलवर वाहतूक पोलिस असतानाही ते डाव्या बाजूला वळण घेणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक मोकळी करत नसल्याने वादावादीचे प्रसंग उद्‌भवतात. वाहतूक पोलिसांनाच नवीन उपक्रमांविषयी अनभिज्ञ असल्याने वादात आणखीच भर पडते आहे. वाहतूक शाखेकडून ‘लेफ्ट टर्नला नो एंट्री’ देण्यात आल्याबाबत कोणतेही प्रबोधन वा जनजागृती करण्यात आलेली नाही. 

अकारण हॉर्न अन्‌ अपघात
बऱ्याचदा समोरून वाहतूक सुरू असतानाही डाव्या बाजूने वळण घेताना अपघाताची शक्‍यता अधिक होती. त्याचप्रमाणे शहरातील अनेक सिग्नलवर डाव्या बाजूला वळण घेण्यासाठीची वाहतूक बेटे नाहीत. त्यामुळे लाल दिवा असेल तेव्हा थांबलेली वाहने पूर्ण रुंदीच्या रस्त्यावर थांबतात. त्यामुळे डाव्या बाजूला वळण घेण्यासाठी पाठीमागून आलेल्या वाहनाला पुढे जाता येत नाही. त्यामुळे तो हॉर्न वाजवितो आणि त्यातून ध्वनिप्रदूषण होते. यातून मार्ग काढण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर लेफ्ट टर्न बंद करण्याचा उपक्रम राबविण्यात येतो आहे.

सिग्नलचे दिवेही बदलणार
याच धर्तीवर शहरातील सिग्नल्सचे दिवेही लवकरच बदलण्यात येणार आहेत. डाव्या बाजूला वळण घेताना आतापर्यंत सिग्नलवर हिरव्याच दिव्याचा बाण असतो. यात बदल होऊन तो पिवळ्या रंगाचा असेल. या दिव्याचा अर्थ अर्थातच, डाव्या बाजूला वळण घ्या. पण समोरील वाहतूक पाहून सावधगिरी बाळगा असा असणार आहे. 

वाहतूक नियमानुसार, डावीकडे, समोर व उजवीकडे वळण घेताना एकाच वेळी सिग्नल मिळतो. मात्र अजूनही बहुतांश वाहनाचालकांना डावीकडे वळताना सिग्नलची गरज नाही असेच वाटते. प्रत्यक्षात तसे नाही. ज्या ठिकाणी डावीकडे वळण घेण्यासाठीचे वाहतूक बेट आहे, त्या ठिकाणी ते शक्‍य असते. त्यामुळे सध्या काही सिग्नलवर डावीकडे वळताना वाहतूक सिग्नलचे पालन करणे आवश्‍यक असेल. 
- सुरेश पटेल, नाशिक फर्स्ट

या सिग्नलवर लेफ्ट टर्नला नो एंट्री
सिटी सेंटर मॉल
एबीबी सिग्नल
जेहान सिग्नल  
गंगापूर नाका
टिळकवाडी सिग्नल
कॅनडा कॉर्नर

Web Title: nashik news left turn no entry on signal