अखेर बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

निघाला भक्ष्याच्या शोधात अन्‌ अडकला पिंजऱ्यात; हायड्रो कार्यालय परिसरात सुटकेचा निःश्‍वास

नाशिक - गेल्या महिनाभरापासून हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला अखेर आज दिंडोरी रोडवरील जलगती संशोधन विभागातील (हायड्रो) कार्यालयाच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. त्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह पंचवटीकरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

निघाला भक्ष्याच्या शोधात अन्‌ अडकला पिंजऱ्यात; हायड्रो कार्यालय परिसरात सुटकेचा निःश्‍वास

नाशिक - गेल्या महिनाभरापासून हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला अखेर आज दिंडोरी रोडवरील जलगती संशोधन विभागातील (हायड्रो) कार्यालयाच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. त्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह पंचवटीकरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

हायड्रो कार्यालयाच्या परिसरात गेल्या शनिवारी (ता. ९) बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर या ठिकाणी वन विभागाने पाहणी केली व परिसरातील नागरिकांना सूचना दिल्या. तसेच काल (ता. १०) या कार्यालयाच्या परिसरात सायंकाळी बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात आला. बिबट्या आकर्षित व्हावा, यासाठी पिंजऱ्यात शेळीही ठेवण्यात आली होती. त्यामुळे भक्ष्याचा शोधात असलेला बिबट्या रात्रीच्या वेळी अलगद पिंजऱ्यात अडकला. 

रात्री ड्यूटीवर असलेल्या तुकाराम भोईर व प्रकाश आडोळकर यांना पिंजऱ्याचे दार खाली पडलेले दिसल्याने त्यांनी ही बाब वन विभागाला कळविल्यानंतर तातडीने वन विभागाचे पथक आज सकाळी सातच्या सुमारास या कार्यालयात पोचले. त्यानंतर येथून पिंजरा हलविण्यात आला. सायंकाळी त्याला सुरक्षित ठिकाणी सोडणार असल्याचे सांगितले.

सोशल मीडियावर धूम
बिबट्या पकडल्यानंतर त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यात दोन कर्मचारी बिबट्या उचलून नेत आहेत असे चुकीचे छायाचित्रही व्हायरल झाले. मुळात बिबट्याला कुणी हातच लावलेला नव्हता. तसेच या पिंजऱ्यात ठेवण्यात आलेली शेळी परिसरातील कुत्र्यांनी फस्त केली, अशीही अफवा पसरली होती. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती शेळी परत आणली.

गेल्या पंधरा दिवसांपासून आमच्या कार्यालयातील कर्मचारी भीतीच्या सावटाखाली होते. आमच्या कार्यालयाच्या परिसरात प्रचंड झाडी असल्याने त्याला लपायला भरपूर जागा आहे; परंतु आता बिबट्या जेरबंद केल्याने भीतीचे वातावरण कमी झाले आहे. 
- आनंदा कुसमोडे, कार्यकारी अभियंता, जलगती संशोधन विभाग

चर्चेला पूर्णविराम; पण आणखीही असण्याची शक्‍यता 
दिंडोरी रोडवरील तारवालानगर येथे २० ऑगस्टला एका स्कॉर्पिओचालकाने बिबट्या पाहिला होता. त्यानंतर जलविज्ञान कार्यालयाच्या परिसरात त्याने कुत्रा मारला होता. मखमलाबाद शिवारातील किरण पिंगळे यांच्या शेतात बिबट्या दिसला. हनुमानवाडी परिसरातील मोरे मळ्यात किसन जगझाप यांच्या मळ्यातही बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर गेल्या आठवडाभरापासून तो हिरावाडी परिसरात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती. शनिवारी (ता. ९) एका ठेकेदाराने हायड्रोच्या भिंतीवर बिबट्या बसलेला पाहिला. त्याचे छायाचित्र व्हायरल झाले. त्यानंतर वन विभागाने या परिसरात पाहणी करून पिंजरा लावला. काल रात्री या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने आता बिबट्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे पण अजूनही या भागात एखाददुसरा बिबट्या असू शकतो, असे बोलले जात आहे.

गेल्या वीस दिवसांपासून पंचवटी परिसरात बिबट्या असल्याने तो पकडण्यासाठी आमची एक टीम कार्यरत होती. ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात येऊनही तो पकडला जात नव्हता. अखेर आज हायड्रोच्या कार्यालयातील पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात आला. आज सायंकाळच्या वेळी त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार आहे. 
- प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी

Web Title: nashik news leopard catch