नाशिकमध्ये वाढली शेतकरी संपाची धग

महेंद्र महाजन
सोमवार, 5 जून 2017

पाचव्या दिवशी बंद राहिल्याने पाच दिवसांमधील शेतमालाची 132 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. त्याचबरोबर मुंबई आणि गुजरातला दिवसाला जाणाऱ्या 2 हजार टन भाजीपाला-कांदे-दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

नाशिक - प्रयोगशील आणि लढवय्या शेतकऱ्यांची कृषीपंढरी म्हणून राज्यभर ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश गावे सलग आज पाचव्या दिवशी कडकडीत बंद राहिली आहेत. आठवडे बाजार भरले नाहीत. एवढेच नव्हे, तर आज थेट सरकारला आव्हान देत प्रतिकात्मक पुतळ्याची गावा-गावांमधून अंत्ययात्रा काढत नदीकाठी अग्निडाग देण्यात आला आहे. रस्त्यावर उतरुन भाजीपाला-दुधाची वाहने रोखत शेतकऱ्यांनी संपाची धार वाढवली.

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या पाचव्या दिवशी बंद राहिल्याने पाच दिवसांमधील शेतमालाची 132 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. त्याचबरोबर मुंबई आणि गुजरातला दिवसाला जाणाऱ्या 2 हजार टन भाजीपाला-कांदे-दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. नाशिकमधील हॉकर्स आणि टपरीधारक संघटनेने बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने शहराच्या विविध भागामध्ये संपाच्या काळात मिळणाऱ्या फळभाज्या शहरवासियांना मिळणे मुश्‍कील झाले आहे.

शेतकरी संप आणि आजच्या बंदची जिल्ह्यातील तालुकानिहाय स्थिती अशी -
निफाड
- बसस्थानकात शुकशुकाट. सायखेडा आणि 32 खेड्यात बाजारपेठा बंद. चांदोरी बंद. भेडाळी येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. वनसगावमध्ये रस्त्यावर भजन. नांदूरमधमेश्‍वर येथे निफाड-सिन्नर मार्गावर ट्रक आडवा लावून अडवली वाहतूक. म्हाळसाकोरेमध्ये बंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन. कोकणगावमध्ये पोलिसांना दिले निवेदन.

येवला - धुळगावकरांचा आणि मुखेड फाटा येथे रास्ता-रोको. मुखेडमध्ये बंद आणि बस रोको आंदोलन. जळगाव नेऊर येथे मुलांना दूध वाटप आणि बंद. एरंडगाव येथे सरकारची अंत्ययात्रा. युवकाने केले मुंडन. निमगाव मढ येथे बंद. सायगाव येथे कांदा आंदोलन. पाचव्या दिवशीही बंद. नगरसूल येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा आणि दहन.

नांदगाव - वाखारी येथे चक्काजाम. न्यायडोंगरी येथे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. जळगाव खुर्द येथे बंद. साकोरे येथे रास्ता-रोको. भालूरमध्ये कडकडीत बंद.

कळवण - कडकडीत बंद आणि रास्ता-रोको. आदिवासींनी केले मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. निवाणे येथे बंद. कळवण-देवळा शहराला पुरवठा होणाऱ्या दुधासह शेतमालाची वाहतूक अडवली. शाळेच्या पिशवीतून लपवून दूध नेणाऱ्यास अडवून दूध रस्त्यावर ओतले.

दिंडोरी - खेडगावमध्ये बंद.
मालेगाव - निमगाव येथे आठवडा बाजार बंद.
इगतपुरी - बाजारपेठ बंद.
नाशिक - मातोरी गाव बंद. रास्ता-रोको आणि शेतकऱ्यांनी शेतमाल ओतला रस्त्यावर.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
महाराष्ट्र 'बंद' यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'​
भारताचा पाकवर 124 धावांनी दणदणीत विजय​
'दानवेंच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्याचा तपास करा'
मॉन्सूनचे महाराष्ट्रात गुरुवारी आगमन​
मुंबईत भाज्यांच्या किमती भडकल्या

Web Title: nashik news maharashtra news farmer strike continues in nashik