वीस गुंठा कोथिंबिरीवर फिरविला ट्रॅक्‍टर

खंडू मोरे
रविवार, 28 मे 2017

खामखेडा व परिसरातील पिळकोस, भादवण, विसापूर, बिजोरे परिसर पाच वर्षांपासून भाजीपाल्याचे आगर म्हणून ओळखला जातो. पुनंद व गिरणा या नद्यांना येणाऱ्या उन्हाळ्यातील आवर्तनामुळे नदीकाठावरील या भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकतो.

खामखेडा : येथील शेतकरी नामदेव शेवाळे यांनी वीस गुंठा क्षेत्रावरील कोथिंबिरीवर ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने रोटर फिरविला आहे. कोथिंबीर विक्रीतून भांडवलही निघणार नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

खामखेडा व परिसरातील पिळकोस, भादवण, विसापूर, बिजोरे परिसर पाच वर्षांपासून भाजीपाल्याचे आगर म्हणून ओळखला जातो. पुनंद व गिरणा या नद्यांना येणाऱ्या उन्हाळ्यातील आवर्तनामुळे नदीकाठावरील या भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकतो. पन्नास दिवसांत पिके काढणीला येतात म्हणून या भागात मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यात एप्रिल, मे महिन्यात कोथिंबीर लागवड होत असते.

येथील नामदेव शेवाळे यांनी वीस गुंठा क्षेत्रात वीस किलो कोथिंबिरीचे बियाणे टाकले होते. त्यासाठी तीन हजारांचे तणनाशक, तसेच एका फवारणीसह रासायनिक खतांसाठी चार हजार असा दहा ते बारा हजार रुपये खर्च केला होता. सध्या पीक काढणीला आले असताना बाजारभाव पडल्याने, व्यापारी मिळत नसल्याने व उत्पादन खर्चही निघणार नसल्याने श्री. शेवाळे यांनी रोटर फिरवत शेत नांगरून टाकले.

सध्या शेतकऱ्यांचा सर्वच भाजीपाला मातीमोल विकावा लागत आहे. कोबी, फ्लॉवरसारख्या भाज्या होलसेल मार्केटला रुपया ते दीड रुपया किलो दराने विकल्या जात आहेत. वांगी, टोमॅटो या भाज्यांचेही दर दोन ते तीन रुपये किलोच्या घरात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

Web Title: Nashik News Malegaon News Farming agriculture