मनमाड ग्रामीण पोलिस ठाणे निर्मितीच्या हालचाली

मनमाड ग्रामीण पोलिस ठाणे निर्मितीच्या हालचाली

मनमाड - शहराची वाढती लोकसंख्या व येथील महत्त्वाची शासकीय कार्यालये पाहता मनमाड शहर पोलिस ठाण्यावर मोठा भार पडत आहे. त्यात ग्रामीणच्या १९ गावांचा कारभार व कमी कर्मचारी यामुळे पोलिसांना ग्रामीणला वेळ देता येत नाही. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी मनमाड ग्रामीण पोलिस ठाण्याची निर्मिती प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मनमाडची लोकसंख्या सव्वा लाख आहे. शहराची भौगोलिक स्थिती पाहता येथे रेल्वेचे  जंक्‍शन स्थानक आणि कारखाना आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांतून दररोज सुमारे १४३ गाड्या ये-जा करतात. देशात कुठेही अनुचित प्रकार घडल्यास या स्थानकावर हायअलर्ट जारी केला जातो. शिर्डी, गुरुद्वारा येथे दर्शन घेण्यासाठी देशभरातील भक्त येथे येतात. आशिया खंडातील सर्वांत मोठी अन्न महामंडळाची गुदामे आणि पानेवाडी येथे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, गॅस प्रकल्प आहे. शहरातून इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग, नगर, नाशिक, मालेगाव-धुळे, औरंगाबादकडे जाणारे राज्य महामार्ग आहेत. त्यामुळे येथे व्हीआयपींचा मोठा राबता असतो.

हे शहर संवेदनशील आहे. कोणतेही सण-उत्सव असले की कडक बंदोबस्त असतो. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या सर्वांचा भार एकमेव शहर पोलिस ठाण्यावर पडतो. शहराबरोबर बोयेगाव, भार्डी, नवसारी, खादगाव, अस्तगाव, पांझणदेव, धोटाणे बुद्रुक, धोटाणे खुर्द, पानेवाडी, नागपूर, बेजगाव, मोहेगाव, भालूर, माळेगाव कर्यात, घाडगेवाडी, नारायणगाव, कऱ्ही, एकवई, अनकवाडे, जोंधळवाडी या १९ गावांचा कारभारही याच पोलिस ठाण्यावर आहे. पूर्वी ३५ हजार असलेल्या लोकसंख्येनुसार येथे पोलिस निरीक्षक-१, पीएसआय-३, एपीआय-२, कर्मचारी-१२८ पदांची मंजुरी आहे. मात्र, प्रत्यक्षात आता पोलिस निरीक्षक-१, पीएसआय-२, एपीआय-१, कर्मचारी-४२ इतकी अल्प कर्मचारी संख्या आहे. मात्र, आता शहराची लोकसंख्या सव्वा लाख झाली आहे. शहराचाच कारभार मोठा असल्याने पोलिसांना ग्रामीणकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. महामार्गावर अपघात झाल्यास हद्दीचा प्रश्‍न निर्माण होतो. ग्रामीण पोलिस ठाण्याला सध्या शहराला जोडलेली ही १९ गावे तसेच शहरालगत असलेली मात्र येवला, चांदवड, नांदगाव, मालेगाव तालुक्‍याच्या सीमारेषा असलेली गावे चांदवडचे रायपूर, भडाणे, शिंगवे, मेसनखेडी, वागदर्डी, दहेगाव, कुंदलगाव, निमोण, मालेगावजवळचे चोंडी घाटाजवळची इतर गावे, येवल्यातील अंकाई, विखरणी, कातरणी, विसापूर, कातरवाडी, चांदगाव, नांदगावचे लोहशिंगवे, सोयगाव, मांडवड, हिसवळ खुर्द, हिसवळ बुद्रुक, भायगाव, धनेर, कोंढार, दऱ्हेल, नांदूर आदी गावांचा समावेश होऊ शकतो. भविष्यात मनमाड तालुका होणार असून, परिसरातील ही गावे तालुक्‍यातच येणार आहेत. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने मनमाड ग्रामीण पोलिस ठाणे निर्माण करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com