मविप्र 'प्रगती'पथावर..!; सरचिटणीसपदी नीलिमाताई पवार

maratha vidya prasarak election
maratha vidya prasarak election

नाशिक : बहुजन समाज आणि मुलींच्या शिक्षणात 104 वर्षांचे योगदान असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या चुरशीच्या अन्‌ क्रिकेटच्या सामन्याप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या निवडणुकीत नीलिमाताई पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी प्रगती पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडवला. प्रगती पॅनलचे सर्वच उमेदवार विजयाच्या समीप येऊन ठेपले, तरीही अखेरच्या चारशेहून अधिक मतांपर्यंत सरचिटणीस पदासाठी समाजविकास पॅनलचे नेते ऍड. नितीन ठाकरे यांनी कडवी झुंज दिली; पण समाजविकास पॅनलचा कडवा विरोध मोडून काढत प्रगती पॅनलने सरचिटणीसपदासह सर्वच 18 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. 

प्रगती पॅनलतर्फे निफाड, मालेगाव आणि "कसमादे'वर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. पॅनलची ही रणनीती फलद्रुप ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. अध्यक्षपदी डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीसपदी नीलिमाताई पवार, सभापतिपदी माणिकराव बोरस्ते, चिटणीसपदी डॉ. सुनील ढिकले, उपसभापतिपदी राघो आहिरे यांच्यासह "प्रगती'चे तालुका संचालकपदाचे सर्व उमेदवार विजयी झाले. त्यात इगतपुरीचे भाऊसाहेब खातळे, कळवण-सुरगाण्याचे अशोक पवार, चांदवडचे उत्तमबाबा भालेराव, दिंडोरीचे दत्तात्रय पाटील, नाशिक शहरचे नानासाहेब महाले, निफाडचे प्रल्हाद कराड, नांदगावचे दिलीप पाटील, सटाण्याचे डॉ. प्रशांत देवरे, मालेगावचे डॉ. जयंत पवार, येवल्याचे रायभान काळे, सिन्नरचे हेमंत वाजे, देवळाचे डॉ. विश्राम निकम, नाशिक ग्रामीणचे सचिन पिंगळे यांचा समावेश आहे. 

केटीएचएम महाविद्यालयाच्या जिमखान्यात सकाळी आठपासून मतमोजणीला सुरवात झाली. सकाळी दहापर्यंत मतपत्रिका एकत्र करण्यात आल्या. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रावसाहेब थोरात सभागृहात सुरू होताच, टेबलवर तालुका, पदाधिकारी आणि सेवक अशा मतपत्रिकांच्या मोजणीला सुरवात झाली. सटाणामधून डॉ. देवरे काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. त्याचबरोबर सरचिटणीसपदाच्या मतमोजणीत श्रीमती पवार आणि ऍड. ठाकरे यांच्यात "काट्याची टक्कर' सुरू होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाच, सहा आणि सातव्या फेरीत डॉ. शेवाळे पिछाडीवर होते. त्यानंतर मात्र अगोदरच्या मताधिक्‍यांच्या जोरावर पुढील फेरीत डॉ. शेवाळे यांनी मुसंडी मारली. सगळ्यात पहिल्यांदा निकाल डॉ. ढिकले यांचा लागला आणि प्रगती पॅनलने खाते उघडले. मात्र, सरचिटणीसपदाची उत्कंठा शिगेला पोचली होती. 

प्रतापदादा अन्‌ नीलिमाताई आमनेसामने 
संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आटोपून माजी खासदार अन्‌ अध्यक्षपदाचे समाजविकास पॅनलचे उमेदवार प्रतापदादा सोनवणे मतमोजणी केंद्रावर पोचले. त्यांच्यापाठोपाठ श्रीमती पवार आणि प्रगती पॅनलचे उमेदवार आले. सरचिटणीसपदाच्या टेबलाजवळ प्रतापदादा आणि नीलिमाताई आमनेसामने आले. त्या वेळी दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. मग नंतर सारे जण मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. त्यानंतर ऍड. ठाकरे मतमोजणीच्या ठिकाणी आले. त्यांनी बराच वेळ पदाधिकाऱ्यांच्या मतमोजणी केंद्रात थांबणे पसंत केले. ते परतले आणि सरचिटणीसपदाच्या मतमोजणी टेबलावरील चुरस लक्षात घेऊन डॉ. ढिकले, माणिकराव बोरस्ते, नानासाहेब महाले आदी पोचले. त्यांच्यापाठोपाठ श्रीमती पवार पुन्हा आल्या. सरचिटणीसपदासाठी असलेल्या चुरशीच्या पार्श्‍वभूमीवर हसतमुखाने श्रीमती पवार यांनी दोन्ही हात उंचावून "काळजी करू नका, सगळे व्यवस्थित होईल', असे सांगत समर्थकांना धीर दिला आणि त्यांनी जिमखान्याच्या कार्यालयात जाऊन बसणे पसंत केले. तालुका संचालक आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे निकाल एकामागून येत होते. अखेरचा निकाल सरचिटणीसपदाचा लागला. 

"प्रगती'च्या समर्थकांचा जल्लोष 
प्रगती पॅनलच्या उमेदवारांचा विजय जसजसा जाहीर होत होता तसा या पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरवात केली. अखेरच्या चारशेहून अधिक मतांच्या मोजणीनंतर प्रगती पॅनलच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रात नीलिमाताईंच्या विजयाच्या घोषणा दिल्या. ऍड. ठाकरे यांच्या मतमोजणीसाठी अखेरपर्यंत थांबलेले सचिन ठाकरे आणि समाजविकास पॅनलच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्र सोडले. त्यानंतर नीलिमाताई सर्व पदाधिकारी आणि संचालकांसह समर्थकांपुढे आल्या व त्यांनी विजयाचे श्रेय सभासद, समर्थक, कार्यकर्त्यांना दिल्या. या वेळीही प्रगती पॅनलच्या विजयाच्या घोषणांनी समर्थकांनी परिसर दणाणून सोडला. निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ऍड. भास्करराव चौरे, सदस्य ऍड. बाकेराव बस्ते, सदस्य ऍड. रामदास खांदवे, सचिव डॉ. डी. डी. काजळे आणि लवादाचे अध्यक्ष ऍड. खालकर यांच्या उपस्थितीत मंडळातर्फे निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर विजयी उमेदवारांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र निवडणूक मंडळातर्फे प्रदान करण्यात आले. 

लोकशाहीचा विजय आहे ः दाते 
सेवकांच्या निवडणुकीत नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, नंदा सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज लवादाने रद्दबातल ठरवला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी देण्यात आली. या तिघांनीही या निवडणुकीत बाजी मारली. मावळते सेवक संचालक डॉ. अशोक पिंगळे यांच्या पॅनलच्या त्यांच्यासह इतर दोघांना पराभवाचा धक्का बसला. या विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. दाते म्हणाले, की हा लोकशाहीचा विजय आहे. सेवकांनी आमच्या तिघांवर टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला जाईल. सेवकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यात येतील. 

"सत्य परेशान होता है, लेकिन पराजित नहीं होता' याची प्रचीती निकालातून आली आहे. हा नैतिकतेचा विजय आहे. या निवडणुकीत वेगळा निकाल लागला असता, तर विद्यार्थ्यांचा आणि सभासदांचा चांगल्या कामावरील विश्‍वास उडाला असता; पण तसे घडले नाही. मुळातच, सेनापतीने युद्धीभूमीवर सगळ्यात अगोदर पुढे जायचे असते. मग सैन्य मागे येते; पण सेनापतीने एक मत मागितल्यास काय होते, हे निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीसाठी प्रयत्नशील असलेल्या सर्वांचे हे यश आहे. सगळ्या कर्मवीरांना आज आनंद झाला असणार. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संस्थेला आणखी प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न केला जाईल. 
- नीलिमाताई पवार, सरचिटणीस 

नीलिमाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामाची सभासदांनी पावती दिली आहे. सभासदांच्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता संपूर्ण "टीम' समाजसेवेसाठी कार्यरत राहील. 
- डॉ. तुषार शेवाळे, नवनिर्वाचित अध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com