बाजार समिती सभापतिपदी शिवाजी चुंभळे बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पंचवटी - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आज अपेक्षेप्रमाणे शिवाजी चुंभळे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदी संजय तुंगार यांनी बाजी मारली. या निवडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे समितीवरील तब्बल वीस वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले. बैठकीला देवीदास पिंगळे वगळता सर्व १७ संचालक उपस्थित होते.

पंचवटी - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आज अपेक्षेप्रमाणे शिवाजी चुंभळे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदी संजय तुंगार यांनी बाजी मारली. या निवडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे समितीवरील तब्बल वीस वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले. बैठकीला देवीदास पिंगळे वगळता सर्व १७ संचालक उपस्थित होते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १८ जागा आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत माजी खासदार पिंगळे यांच्या पॅनलने १५ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले होते. कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसच्या रकमेसह अन्य प्रकरणांत सभापती पिंगळे अडचणीत आल्याने त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात श्री. पिंगळे यांच्यावरील अविश्‍वास ठरावही मंजूर झाल्याने त्यांची समितीवरील सद्दी संपली होती. यादरम्यान त्यांच्यामागे असलेल्या अन्य संचालकांनीही त्यांची साथ सोडल्याने ते एकाकी पडले होते. याशिवाय समितीच्या कामकाजात हस्तक्षेप न करण्याच्या सूचनाही त्यांना न्यायालयाने दिल्या होत्या. 

अविश्‍वास ठराव मंजूर झाल्यावर आज सकाळी नवीन सभापती व उपसभापतिपद निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अमोल एडके यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया झाली. सकाळी अकराला निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. सभापतिपदासाठी चुंभळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदासाठी संजय तुंगार यांच्यासह युवराज कोठुळे व चंद्रकांत निकम यांनी अर्ज दाखल केले. मात्र, कलम १३-९ अन्वये कोठुळे यांचा अर्ज फेटाळण्यात आला, तर निकम यांनी माघार घेतल्याने उपसभापतिपदी तुंगार यांची निवड झाली. या वेळी श्री. चुंभळे व तुंगार यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोघांची निवड होताच समितीच्या आवारात आतषबाजी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी सभापती चुंभळे यांचे औक्षण केले.
 

प्रक्रिया पारदर्शकच - एडके
सभापती-उपसभापतिपदासाठी आज सकाळी बैठक बोलविण्यात आली. बैठकीस पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. सभापतिपदाच्या निवडीनंतर उपसभापतिपदाची निवड झाली. यादरम्यान अनेक संचालकांचे दालनातून ये-जा सुरू होते. निवडणुकीनंतर याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्रकारांनी छेडले असता निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे व इन कॅमेरा पार पडल्याचे एडके यांनी सांगितले.

Web Title: nashik news market committee chairman shivaji chumbhale