तहानलेल्या गावांना धातूच्या टाक्‍यांचा आधार

महेंद्र महाजन
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

नाशिक - जळगाव, औरंगाबाद, नगर, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि नांदेड या जिल्ह्यांतील 97 टंचाईग्रस्त गावांना उन्हाळ्यात तीन महिने पुरेल इतक्‍या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून धातूच्या टाक्‍या उभारण्यात येणार आहेत. मानसिंग तांडा (जि. नांदेड) येथे पहिल्या टाकीची उभारणी करण्यात आली आहे. फत्तूसिंग तांडा येथे काम सुरू करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात पिण्याच्या पाण्यासाठी पहिल्यांदा अशा टाक्‍यांची उभारणी करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील सहा आदिवासी पाड्यांवर असाच प्रकल्प राबवला आहे.

जागतिक बॅंकेच्या सहकार्याने जलस्वराज्य प्रकल्प दोन अंतर्गत हा उपक्रम भूजल सर्वेक्षण विभागातर्फे राबवण्यात येत आहे. पाचशेपेक्षा कमी लोकसंख्या आणि वर्षभर पाणीपुरवठ्याची योजना असूनही उन्हाळ्यात टॅंकर लावण्यात येणाऱ्या या निकषांतर्गत ही गावे निवडण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात ही 97 गावे टॅंकरमुक्त होण्यास मदत होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलसाठी टाक्‍या उभारल्याचे चित्र यापूर्वी पाहावयास मिळत होते; पण हे तंत्रज्ञान महागडे असल्याने त्याचा फारसा विचार झाला नव्हता. आता मात्र पाच ते सात रुपये प्रतिलिटर इतक्‍या खर्चात टाकी उभारणी शक्‍य झाले आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये अशा पद्धतीच्या टाक्‍यांचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.

दीड दिवसात उभारली जाते टाकी
टाकीसाठी चौथरा उभारण्यासाठी अर्धा तास लागतो. त्यानंतर एक दिवसामध्ये टाकीची उभारणी होते. धातूचे पत्रे नट-बोल्टने जोडले जातात. आतील बाजूला पॉलिमर मटेरिअलचे अस्तर असते. तसेच, टाकीच्या शेजारी पाच हजार लिटरची टाकी उभारण्यात येते. धातूच्या टाकीतून पाच हजार लिटरच्या टाकीत पाणी घेऊन वापरण्याची सोय करण्यात येत आहे. या उपक्रमातील टाकीचे आयुष्यमान 80 वर्षांचे आहे. शिवाय, टाकीतील पाणी वापरातून आरोग्याचा प्रश्‍न तयार होऊ नये म्हणून क्‍लोरिनेटर बसवण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत किमान एक लाख लिटरची टाकी उभारण्यात येत आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत असताना आदिवासींच्या पाड्यांसाठी टाकी उभारण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. त्या वेळी 75 हजार, एक लाख, दीड लाख लिटर अशी टाकीची क्षमता ठेवण्यात आली होती. त्यासाठी 12 रुपये लिटर असा खर्च टाकीसाठी आला होता. आता मात्र त्यात निम्म्याने घट झाली आहे. या उपक्रमातून 97 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.
- शेखर गायकवाड, संचालक, भूजल सर्वेक्षण विभाग, पुणे

Web Title: nashik news metal water tank