मी लाभार्थी जाहिरातींचे विडंबनांतून सोशल मीडियावर खिल्ली

खंडू मोरे
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

'मी लाभार्थी' या जाहिरातीमध्ये सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुभव सांगितले आहेत. मी लाभार्थी आणि हे माझे सरकार' असे सांगत त्या लाभार्थ्यांनी सरकारचे कौतुक केले आहे. नेमका हाच धागा पकडत सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर जोरदार टीका सुरू झाली आहे. ह्या पोस्ट सध्या शासनकर्ते, भाजप पक्षाच्या लोकप्रतिनिधी, संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणाऱ्या आहेत.

खामखेडा (नाशिक) : राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सरकारकडून प्रत्येक क्षेत्रात काय कामे केली हे लोकांपर्यंत पोचविण्यासाठी जाहिरातींमध्ये त्या त्या क्षेत्रातील लाभार्थ्यांसह दृकश्राव्य जाहिराती दाखवत आहेत. मात्र, सोशल मीडियावर सरकारच्या या जाहिरातींचे विडंबन करून मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जात आहे. 'मी लाभार्थी' हा चेष्टेचा विषय बनला आहे. 

भाजप सरकारने आता आपली कामे व योजना जनतेसमोर आणण्यासाठी जाहिरातींचा भडिमार सुरू केला आहे. आमच्या योजनांमुळे सर्वसामान्यांना कसा फायदा होत आहे, हे दाखविण्यासाठी रस्ते दळणवळण, स्वच्छालय, शेती, शेततळे, जलसंधारण, डिजिटल व्हिलेज, महा-ई-सेवा केंद्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवरील 'मी लाभार्थी' या जाहिरातींमधून प्रसिद्धी करण्यात येत आहे. ह्याच विषयांवर सध्या सोशियल मीडियातून विडंबनात्मक जाहिरात इमेजेस बनवून सरकारची खिल्ली उडवली जात आहे.

रस्त्यांच्या जाहिरातीचा मला संधीवाताचा त्रास होता. माझी सर्व हाडे आखडून गेली होती. त्याचा खूप त्रास होत होता. मी लखमापूर ते निंबोळा रोडने प्रवास केला. आता मला खूप छान वाटतंय. आखडलेली सर्व हाडे मोकळी झाली आहेत. व्हय मी लाभार्थी, हे माझं सरकार...! 
त्याच बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो वापरून अशी कोपरखळी मारण्यात आली आहे- पूर्वी माझी गाणी माझे यजमानदेखील ऐकायचे नाहीत. पण भाजपा सरकार आल्यामुळे, माझा व्हिडिओ अल्बम निघाला. होय, मी लाभार्थी. हे माझे सरकार आहे. - अमृता फडणवीस (बँकर)

काही ग्रुपवर अरे बाबांनो एकदा कबुल करून टाकारे खूप विकास झालाय. नाहीतर अजून १००० हजार कोटी खर्च करेल, जाहिरातींवर हे सरकार तुम्हा आम्हाला समजविण्यासाठी (कोणत्याही प्रकारचा नसलेला मी लाभार्थी), अशा प्रकारची टिपण्णी करण्यात येते. 

'मी लाभार्थी सरसकट कर्जमाफी न मिळाल्याचा, मी लाभार्थी शेतमालास चांगला बाजार भाव न मिळाल्याचा, मी लाभार्थी वाढलेल्या बेरोजगारीचा, मी लाभार्थी वाढलेल्या गुन्हेगारीचा, वाढलेल्या महागाईचा, मी लाभार्थी न मिळालेल्या मराठा, धनगर, मुस्लिम, आरक्षणाचा, मी लाभार्थी न मिळालेल्या शेतीमाल हमीभावाचा, अशा प्रकारची वाक्‍यही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यांसह शेकडो संदेश, इमेजी सध्या सोशल माध्यमातून अतिशय कुशलतेने फिरवले जात आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news mi labharthi bjp govt ad campaign mockery