परतीच्या प्रवाशांमुळे दोन दिवसांत महामंडळाला दोन कोटींचा गल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नाशिक - दिवाळीच्या सुट्यांनिमित्त घराबाहेर पडलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू असल्याने सध्या बसस्थानकांवर गर्दी बघायला मिळत आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. पुणे व धुळ्यासह सटाणा, मालेगावसाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे महामंडळाला दोन कोटींचे उत्पन्न मिळाले. 

दिवाळी सण साजरा करण्यासाठी चाकरमाने, भाऊबीजसाठी महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन महामंडळातर्फे नियोजित वेळापत्रकाव्यतिरिक्‍त जादा बसगाड्यांची व्यवस्था केली होती. तसेच दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढदेखील केली होती. मात्र, ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे संपूर्ण नियोजन कोलमडले होते. या आंदोलनाचा मोठा आर्थिक फटका महामंडळाला बसला असून, कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरले. 

संप मिटल्यानंतर शहर परिसरातील बसस्थानकांवर शनिवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळाली होती. या दिवशी महामंडळाला 71 लाख 92 हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे, तर काल रविवारच्या सुटीनिमित्तही मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक झाल्याने महामंडळाच्या गल्ल्यात एक कोटी दहा लाख 14 हजार रुपयांची भर पडली. गेली दोन दिवस सुमारे दोनशे बसगाड्या प्रवासी वाहतूक करत होत्या. आजदेखील प्रवाशांचा ओघ कायम राहिला. परंतु बहुतांश मार्गांवर प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने बसफेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. सुमारे 130 बसगाड्यांतून प्रवासी वाहतूक सुरू होती. 

Web Title: nashik news msrtc st bus