महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून ३२ लाखांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

नाशिक - महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी ३२ जणांना तब्बल ३२ लाखांना गंडा घातला. मुंबई नाका पोलिसांत रात्री गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी जहीर शेख, अजीम शेख, राहुल शहाणे यांना अटक केली आहे. 

नाशिक - महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी ३२ जणांना तब्बल ३२ लाखांना गंडा घातला. मुंबई नाका पोलिसांत रात्री गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी जहीर शेख, अजीम शेख, राहुल शहाणे यांना अटक केली आहे. 

मजहर इस्माईल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की संशयित अजीम शेख याने जकी कोकणी यांच्या नावाचा वापर करून मुलास महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. २९ ऑक्‍टोबर २०१६ ला फोनवर कोकणी बोलत असल्याचे भासवून महापालिका आयुक्त मित्र असून, नोकरीसाठी दीड लाख रुपये जहीर शेख याच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे पैसे दिले. १६ जून २०१७ ला फोनवरून सव्वादोन लाखांची मागणी केली. नाही दिले, तर आधी दिलेले पैसेही मिळणार नाहीत, असे सांगितले. परत काही दिवसांनी फोन  आला आणि पैशांची मागणी केली. दिले नाही, तर ठार करण्याची धमकी दिली. याबाबत जेएमसीटी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना माहिती दिली. त्यांनी फोन नंबर पाहून हा जकी कोकणी यांचा फोन नसल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

अल्ताफ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की १५ फेब्रुवारी २०१७ ला फोन आला आणि जकी कोकणी बोलत असून, काही मदत लागल्यास देऊ, असे सांगितले. नंतर वाढदिवशीही रिक्षातून संशयित जहीर शेख केक घेऊन आला. परत फोन आला आणि महापालिकेत नोकरी असून, तुमच्या मुलाला लावून देतो, असे सांगून पाच लाख रुपये मागितले. पठाण यांनी समर्थनगरमधील दर्गा येथे अजीम शेखला पैसे दिले. नंतर परत १६ जागा असून, त्यासाठी मुले आणायला सांगितली. ५० हजारांप्रमाणे आठ लाख रुपये नातेवाइकांकडून आणून दिले. नोकरीची चौकशी केली, तर परत १४ जागा निघाल्याचे सांगितले. पैसे भरले, की सर्वांची एकावेळी ऑर्डर निघेल, असे सांगितले. परत नातलगांना भेटून १४ जणांचे सात लाख रुपये दिले. ते पैसे घेण्यासाठी संशयित शहाणे, जहीर शेख, अजीम शेख आले होते. शेवटी परत इंजिनिअरची जागा सांगून पाच लाख घेतले, असे २६ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र, नोकरी मिळाली नाही. म्हणून पैशांची मागणी केली, तर ठार करण्याची व जकी कोकणी काय करेल, असे धमकावले. ही बाब खतीब यांच्या कानावर गेली. त्यांनी तत्काळ जकी कोकणीकडे नेले. त्यांनी मी कोणालाही फोन केलेला नाही, असे सांगून पोलिसांत जाण्यास सांगितले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: nashik news municipal corporation