महापालिका गाळ्यांची शहरात होणार तपासणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नाशिक - पोलिस आयुक्त कार्यालयासमोरील तिबेटियन मार्केटमध्ये झालेल्या स्फोटामुळे महापालिकेच्या सर्व गाळ्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी समिती स्थापन केली असून, नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास गाळा जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.

तिबेटियन मार्केटमध्ये शनिवारी रात्री स्फोट झाला होता. त्यात नऊ गाळ्यांचे नुकसान झाले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत गॅसगळतीमुळे स्फोट झाल्याचे निष्पन्न झाले. एकीकडे पोलिसांचा तपास सुरू असताना दुसरीकडे महापालिकेने घटनेची गंभीर दखल घेतली आहे. महापालिका ग्राहकांना गाळा ताब्यात देते, त्या वेळी काही नियम व अटी-शर्ती घातलेल्या असतात. त्यात सर्वांत महत्त्वाची अट ही, की ज्वलनशील पदार्थ गाळ्यात ठेऊ नये. परंतु गाळेधारकांकडून नियम व अटी बाजूला सारून व्यवसाय केले जात असल्याचे समोर आले आहे. ज्या गाळ्यात स्फोट झाला त्या गाळेधारकाला नोटीस बजावली आहे. हा प्रकार गंभीर असल्याने शहरातील सर्वच महापालिकेच्या गाळ्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात गाळ्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

समितीत विविध कर विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम, अग्निशमन दलप्रमुख अनिल महाजन, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांचा समावेश आहे. महापालिकेचे बारा व्यावसायिक संकुले आहेत. त्यात एक हजार ९०० हून अधिक व्यावसायिक गाळे आहेत. या सर्व गाळ्यांची तपासणी केली जाणार आहे. समिती आयुक्तांना अहवाल सादर करेल व गाळे वापरताना नियमांचे उल्लंघन झाले असल्यास गाळा जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी माहिती दिली.

Web Title: nashik news municipal shop cheaking