मुस्लिम बांधवांकडून पावसासाठी दुआ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

जुने नाशिक - पवित्र रमजान पर्वाची सांगता करत मुस्लिम बांधवांनी विविध उपक्रमांद्वारे रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरी केली. शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात सकाळी दहाला शहाजानी ईदगाह (गोल्फ क्‍लब) मैदान येथे मुख्य नमाज अदा करण्यात आली. देशात सुख-शांती नांदण्यासाठी, तसेच चांगला पाऊस होऊन जनतेची पाण्याची समस्या दूर होऊ द्यावी, अशी दुवा शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांनी मागितली. या वेळी लोकप्रतिनिधींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

जुने नाशिक - पवित्र रमजान पर्वाची सांगता करत मुस्लिम बांधवांनी विविध उपक्रमांद्वारे रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरी केली. शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात सकाळी दहाला शहाजानी ईदगाह (गोल्फ क्‍लब) मैदान येथे मुख्य नमाज अदा करण्यात आली. देशात सुख-शांती नांदण्यासाठी, तसेच चांगला पाऊस होऊन जनतेची पाण्याची समस्या दूर होऊ द्यावी, अशी दुवा शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांनी मागितली. या वेळी लोकप्रतिनिधींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

रमजान पर्वाच्या तीस दिवसांच्या रोजानंतर काल (ता. २५) चंद्रदर्शन झाल्याने आज देशभरात रमजान ईद झाली. मुख्य नमाज शहाजानी ईदगाह (गोल्फ क्‍लब) मैदान येथे झाली. शहराच्या विविध मशिदींमध्ये सामुदायिक नमाजपठण झाले. नमाजपूर्वी मीर मुक्तार अशरफी यांनी ईदचे धार्मिक महत्त्व विशद केले. शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांनी ईदच्या नमाजपठणाची पद्धत समजून सांगितली. त्यानंतर ईदची दोन रकात नमाज झाली. नंतर सलामपठण करून नमाजची समाप्ती झाली. मुमुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पारंपरिक पोशाखात आलेल्या बांधवांसह चिमुकले सर्वांचे आकर्षण ठरत होते. महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, नगरसेवक शाहू खैरे, लक्ष्मण सावजी, जगदीश पाटील, शोभा बच्छाव, फैज बॅंक माजी अध्यक्ष सलीम मिर्झा बेग आदी उपस्थित होते. त्यांनी मुस्लिम बांधवांना पुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. पोलिस कर्मचारी ईदगाह मैदानावर टॉवरच्या माध्यमातून लक्ष ठेवून होते. ईदगाहच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली होती.
 

ईदनिमित्त पुष्प देऊन शुभेच्छा
रमजान ईदनिमित्त गंगापूर, प्रभाग आठमधील नुरानी जामा मशीद येथे सर्व मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देण्यात आले. शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, अनंता चुंभळे, श्री. उन्हाळे, गोकुळ पाटील, दत्ता पाटील, मुरलीधर पाटील, पंकज आरोटे, जगन डंबाळे, अंकुश खताळे, प्रवीण पाटील, मयूर पाटील, कुणाल खताळे, अक्षय पाटील आदी उपस्थित होते.

नमाजपठणानंतर वाहतूक पूर्ववत
गोल्फ क्‍लब येथील ईदगाह मैदानासमोरील त्र्यंबक रोडवरील वाहतूक वळविण्यात आली. नमाजपठण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. सकाळी नमाजपठाण सुरू होण्यापूर्वीच त्र्यंबक नाका सिग्नलकडून मायको सर्कलमार्गे जाणारी वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली. गडकरी सिग्नलकडून वाहतूक चांडक सर्कलमार्गे मायको सर्कलकडे वळविण्यात आली. त्र्यंबक नाका ते मायको सर्कल, शरणपूर रोडवरील टिळकवाडी सिग्नलवरून जलतरण तलावाकडे वळणारी वाहतूक रोखण्यात आली. ही वाहतूक सीबीएस सिग्नलकडून शरणपूर रोड, कुलकर्णी गार्डनमार्गे मायको सर्कलकडे वळविण्यात आली. केवळ पोलिस वाहने व रुग्णवाहिकांना या रस्त्यांवरून परवानगी होती. ईदगाह मैदान परिसरात मुंबई नाका, भद्रकाली व सरकारवाडा पोलिस ठाण्यातर्फे पोलिस बंदोबस्त चोख होता. हा बंदोबस्त गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, परिमंडल-१ चे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, राजू भुजबळ व वाहतूक शाखेचे उपायुक्त अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली होता.

दर्ग्यामध्ये गर्दी
नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी जीपीओ रोड येथील हजरत तुरबअली शहा बाबा दर्गा, हजरत पीर सय्यद शादिकशहा हुसेन बाबा(बडी दर्गा)सह विविध दर्ग्यांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली. पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कब्रस्तानात फातेहापठण करण्यात आले. 

Web Title: nashik news muslim society prayer for rain