बाभूळगाव शिवारात अपघातात दहा ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

येवला - साखरपुडा उरकून धुळ्याकडे जात असलेल्या आणि मनमाडकडून शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांवर सायंकाळी काळाने झडप घातली. नगर-मनमाड महामार्गावर बाभूळगाव शिवारात क्रूझर, मारुती ओम्नी व्हॅन, मोटारसायकल व राज्य परिवहन महामंडळाची बसगाडी या चार वाहनांच्या विचित्र अपघातात दहा जण ठार, तर पंधराहून अधिक जखमी झाले आहेत. या ठिकाणी कुठलेही अपघात क्षेत्र नसताना एकमेकांना वाहने धडकल्याने हा अनर्थ झाला. दरम्यान, जखमींमध्ये काही जण गंभीर आहेत.

येवला - साखरपुडा उरकून धुळ्याकडे जात असलेल्या आणि मनमाडकडून शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांवर सायंकाळी काळाने झडप घातली. नगर-मनमाड महामार्गावर बाभूळगाव शिवारात क्रूझर, मारुती ओम्नी व्हॅन, मोटारसायकल व राज्य परिवहन महामंडळाची बसगाडी या चार वाहनांच्या विचित्र अपघातात दहा जण ठार, तर पंधराहून अधिक जखमी झाले आहेत. या ठिकाणी कुठलेही अपघात क्षेत्र नसताना एकमेकांना वाहने धडकल्याने हा अनर्थ झाला. दरम्यान, जखमींमध्ये काही जण गंभीर आहेत.

मनमाड- येवला मार्गावर शहरापासून दोन किलोमीटरवर निजधाम आश्रमासमोर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हुलकावणी (ओव्हरटेक) देण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. कोळपेवाडी येथून साखरपुडा करून धुळ्याकडे जात असलेल्या क्रूझर जीपला (एमएच २६-एएफ १४८७) हुलकावणी देणाऱ्या पल्सर मोटारसायकल (एमएच ४१- एजे २४८०)चा डॅश मनमाडकडून येवल्याकडे येणाऱ्या धुळे- पुणे या एसटी बसगाडीला (एमएच ४०- एन ९८२१) लागला. याचदरम्यान चालकाने ब्रेक दाबल्याने क्रूझर गाडीचे उजव्या बाजूचे टायर फुटले. त्यामुळे क्रूझर जीप एसटीला साइटने डॅश मारून मनमाडकडून येवल्याकडे येणाऱ्या मारुती ओम्नी व्हॅनवर (एमएच १५-बीएन ६४६७) आदळली. वेगात असल्याने क्रूझरसह मारुती ओम्नी व्हॅन एकमेकांना जोरात धडकल्याने या दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. क्रूझरमध्ये १४ ते १६, तर मारुती ओम्नी व्हॅनमध्ये सात ते आठ प्रवासी होते. हे सर्वजण या अपघातात सापडले. बसमधील कुणालाही नुकसान पोचले नाही, तर पल्सर मोटारसायकलस्वार जखमी झाला.

अपघाताची तीव्रता एवढी होती, की वाहनांचा चक्काचूर झाल्याने काहींचे अवयव विखुरले, तर काहीचे अक्षरशः तुकडे झाले होते. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. याच वेळी पोलिसांसह आजूबाजूच्या नागरिकांनी काही मिनिटांत मदतीचा हात देत जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात पाठविले. ग्रामीण रुग्णालयात येथील अनेक सामाजिक कार्यकर्ते, डॉक्‍टरांनी मदतीचा हात दिला. जखमींची संख्या जास्त असल्याने डॉ. किशोर पहिलवान, डॉ. संजय जाधव या खासगी डॉक्‍टरांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात येऊन डॉ. धनंजय कुलकर्णी, डॉ. संजय सदावर्ते या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना मदत केली. पोलिसांना मृतांची ओळख पटवताना मोठी कसरत करावी लागली. पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी येऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक संजय पाटील, बाळासाहेब भापकर, सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, देवीदास पाटील, अभिमन्यू आहेर आदींसह पोलिस जखमींवर उपचार आणि नातेवाइकांची ओळख पटवत होते.

जखमींवर शहरातील डॉ. शहा यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. भारती महेश राव (सुरत), गुड्डी मरसाळे (जळगाव), स्वप्नील बाविस्कर (धुळे), योगेश रवींद्र मरसाळे (धुळे), भूषण संजय गांगुर्डे (धुळे), इंदूबाई चित्ते (धरणगाव, जळगाव), लताबाई प्रकाश गांगुर्डे, वंश राजू गांगुर्डे, मोहित राजू गांगुर्डे, ज्योती राजू गांगुर्डे, आदी मरसाळे (सर्व रा. धुळे), पिंटू राव (सुरत), विजय प्रकाश गांगुर्डे (धुळे) जखमी आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असून, त्यांना शहरातील डॉ. काकड, डॉ. शहा यांच्या रुग्णालयासह काहींना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

‘यांनी’ गमावला जीव
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आदित्य बबन मरसाळे (वय १२), महेश दिलीप राव (४२, दोघे रा. फाशीपूल, अण्णा भाऊ साठेनगर, धुळे), यश महेश राव (१०), ओम्नीचालक संजय हरी सोनवणे (३२, रा. अयोध्यानगर, मनमाड), निशांत मनोज तिवारी (२३), रिटा अतुल तिवारी (२६), शुभा तिवारी व लक्ष्मीकांत दीक्षित (सर्व रा. इटावा, ता. बरकनर, जि. बाकेनार) हे आठ जण ठार झाले.  त्यानंतर रात्री उशिरा आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते.

जखमींची नावे अशी ः भारती राव (धुळे), पीयूष तिवारी, दीपा तिवारी, शिनू तिवारी (रा. इटावा, उत्तर प्रदेश), लोटन चित्ते (धरणगाव, जि. जळगाव), पवन जाधव (दोंडाईचा). 

विजयला रडू आवरणे कठीण
मारुती व्हॅनमधील इटावा येथील प्रवासी साईदर्शनासाठी शिर्डीला जात असल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. धुळ्यातील फाशीपूल, अण्णा भाऊ साठेनगरमधील रहिवासी असलेल्या विजय गांगुर्डे याच्या साखरपुड्यासाठी क्रूझरमधील प्रवासी कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून ते धुळे येथे परतत होते. गाडीत जागा नसल्याने विजय मित्रासोबत मोटारसायकलवरून धुळ्याकडे जात होता. मात्र, परतताना आपल्याच नातेवाइकांचा अपघात पाहून त्याला मोठा धक्का बसला. रुग्णालयात जखमी व मृतांकडे पाहून त्याला रडू आवरणे कठीण जात होते. पोलिस तसेच काही नागरिक त्याला आधार देत असले, तरी हे दुःख पचविणे त्याला अवघड जात होते. क्रूझरचा चालक जखमी असून, त्याला पोलिस पुनः पुन्हा घटना विचारत होते. मात्र, टायर फुटल्यानंतर काहीच आठवत नसल्याचे तो सांगत होता.

Web Title: nashik news nagar manmad highway accident