महापालिकेतील 23 खेड्यांचा गावनिहाय आराखड्यानुसार विकास 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

नाशिक महापालिकेत 1982 मध्ये समाविष्ट झालेल्या 23 खेड्यांचा प्रश्‍न "सकाळ'ने मांडल्यावर महापौर रंजना भानसी यांनी अंदाजपत्रकात खेडी विकास निधी तरतुदीची घोषणा केली. त्यापुढील पाऊल टाकत आज "सकाळ'तर्फे महापालिकेच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत 23 खेड्यांचा गावनिहाय विकास आराखडा करण्याचा निर्धार महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा अन्‌ नगरसेवकांनी केला. आराखड्यानुसार खेड्यांच्या विकासासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. 

नाशिक महापालिकेत 1982 मध्ये समाविष्ट झालेल्या 23 खेड्यांचा प्रश्‍न "सकाळ'ने मांडल्यावर महापौर रंजना भानसी यांनी अंदाजपत्रकात खेडी विकास निधी तरतुदीची घोषणा केली. त्यापुढील पाऊल टाकत आज "सकाळ'तर्फे महापालिकेच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत 23 खेड्यांचा गावनिहाय विकास आराखडा करण्याचा निर्धार महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा अन्‌ नगरसेवकांनी केला. आराखड्यानुसार खेड्यांच्या विकासासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. 

हॉटेल एसएसकेमध्ये झालेल्या बैठकीसाठी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजीराव गांगुर्डे, आयुक्त अभिषेक कृष्णा, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी महापौर प्रकाश मते, अशोक दिवे, अशोक मुर्तडक, "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने आदी उपस्थित होते. बैठकीमागील भूमिका स्पष्ट करताना श्री. माने म्हणाले, की 23 खेड्यांचा भौतिक विकास साधत असताना शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास यास प्राधान्यक्रम दिला जावा. "सकाळ'तर्फे खेड्यांमधील शेतकरी, कृषी विभाग अन्‌ प्रक्रिया उद्योग व मार्केटिंगमधील तज्ज्ञ यांच्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम होणार आहे. याशिवाय नऊ क्षेत्रांमधील "स्कील गॅप' शोधून काढण्यात आला असून, त्याअनुषंगाने नागरी कौशल्य विकास उपक्रम राबविला जाणार आहे. महापालिकेच्या शाळांमधील 34 हजार विद्यार्थ्यांमध्ये "स्मार्टनेस' यावा म्हणूनही प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी कुटीरोद्योग आणि त्याद्वारे उत्पादित होणाऱ्या मालासाठीच्या बाजारपेठेसंबंधीचे काम केले जाईल. यंदाच्या गणेशोत्सवात शहरातील सार्वजनिक मंडळांनी सामाजिक बांधलकीमधून निधी जमा केला आहे. महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना "स्मार्ट' करण्यासाठी योगदान देण्याचे ठरविले आहे. "सकाळ'च्या माध्यमातून "स्मार्ट संवाद' उपक्रम राबविण्यात आला. त्याचबरोबर पावणेदोन लाख शहरवासीयांच्या अपेक्षा "स्मार्टसिटी'च्या अनुषंगाने जाणून घेण्यात आल्या आहेत. 

खेडी विकासात धन्यता अधिक - महापौर 
खेड्यांचा विकास होण्यातून माझा महापौरपदाचा कालावधी संपन्न झाल्याचे समाधान मिळेल, असे सांगून महापौर भानसी म्हणाल्या, की आयुक्तांनी प्रत्येक प्रभागात रस्त्यांची कामे सुचविण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत योजनेतून निधी देण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार मलवाहिकांची कामे सुचविण्यास नगरसेवकांना सांगितले आहे. महापालिकेच्या शाळांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देत असताना इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न राहील. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाच्या विकासाकडे उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने लक्ष देण्यात येईल. खरे म्हणजे 34 वर्षांपासून माझ्या कुटुंबाचा निवास म्हसरूळ भागात आहे. रस्ते, पाणी, वीज त्या वेळी नव्हते. त्यामुळे खेड्याचे वास्तव आणि प्रश्‍न मला माहीत आहेत. तत्कालीन महापौर विनायक पांडे, उपमहापौर अजय बोरस्ते यांच्या काळात खेडी विकासासाठी एक कोटीचा निधी देण्यात आला होता. त्या वेळी मी व्यक्तिश- धन्यवाद दिले होते. 

शिक्षण, आरोग्य अन्‌ कौशल्य विकासास प्राधान्य - आयुक्त 
शहर विकासांतर्गत खेड्यांच्या विकासासाठी पाच वर्षांचा आराखडा तयार करत असताना कमतरता असलेल्या सुविधा शोधण्याची गरज आहे. त्या गरजांवर आधारित विविध योजनांमधून खर्च करता येईल. स्थानिक नगरसेवकांनी येत्या तीन ते चार महिन्यांत अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा विकासाचा आराखडा तयार करावा. त्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटांची स्थापना करावी. या गटाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास यास प्राधान्य दिले जावे. अशा आराखड्याच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने विकासाची कामे पुढे नेली जातील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

बैठकीसाठी उपस्थित नगरसेवक 
कावेरी घुगे, संतोष गायकवाड, केशव पोरजे, दिलीप दातीर, भागवत आरोटे, हर्षदा गायकर, पुंडलिक खोडे, सतीश कुलकर्णी, राकेश दोंदे, जयश्री खर्जुल, सुदाम डेमसे, सुनीता कोठुळे, चंद्रकांत खाडे, श्‍याम बडोदे, सरोज अहिरे, मीरा हांडगे, पल्लवी पाटील, माधुरी बोलकर, उद्धव निमसे, शीतल माळोदे, सुरेश खेताडे, वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर, रवींद्र धिवरे, सूर्यकांत लवटे, अरुण पवार, नयना गांगुर्डे, गणेश गिते, पुष्पा आव्हाड, गोकुळ निगळ, रंजना बोराडे, सुप्रिया खोडे, चंद्रकांत खोडे, सरिता जाधव, प्रतिभा पवार, किरण गामणे, पूनम सोनवणे, भिकूबाई बागूल. 

माजी महापौर काय म्हणाले? 
प्रकाश मते -
तेवीस खेड्यांचे क्षेत्र 350 ते 400 एकरापर्यंत असेल. या भागाचा "टाउनशिप'च्या धर्तीवर विकास करणे शक्‍य आहे. मात्र, त्यासाठी सरकारशी समन्वय ठेवून धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराला दत्तक घेतल्याने त्यात काही अडचण येईल, असे वाटत नाही. शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लावावा लागेल. शिवाय टिकाऊ विकास होण्यासाठी रस्ते उखडत ठेवणे बंद करावे लागेल. त्यासाठी बांधकाम, गटार, पाणीपुरवठा, वीज या विभागाच्या निविदांसाठी एक व्यवस्था करता येईल काय, हे पाहावे लागेल. याशिवाय खेडी आणि झोपडपट्टी विकासासाठी विशेष चटई क्षेत्र देण्याचे धोरण स्वीकारावे लागेल. 

अशोक दिवे - आरोग्य आणि शिक्षणासाठी निधी दिला जावा. स्वच्छतेकडे लक्ष दिले जावे. त्यातून विकासाचे नक्की समाधान मिळेल. खेडी विकास शीर्षक अंदाजपत्रकात तयार करून त्यासाठी 10 ते 15 टक्के निधी दिला जावा. शिवाय "चेंज ऑफ पर्पज'च्या माध्यमातून महापालिका उत्पन्न वाढवू शकेल. श्री समर्थ रामदास स्वामींची टाकळी, पांडवलेण्यांशेजारील पाथर्डी. प्रत्येक खेड्याला ऐतिहासिक, पौराणिक, आध्यात्मिक पार्श्‍वभूमी असल्याने इथल्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे निधी मागता येईल. सरकारकडून त्यास मदत होईल, असा विश्‍वास वाटतो. स्वाइन फ्लू बळावत चालला असल्याने नगरसेवकांनी आपल्या प्रत्येक खेड्यात लक्ष द्यायला हवे. आपल्या खेड्यातील शाळांची गुणवत्ता वाढवावी. आपली महापालिका शाळा आदर्श करावी. शाळांच्या गरजा पूर्ण कराव्यात. सकस आहार योजनेच्या माध्यमातून समाजात सद्‌भावना तयार होऊ शकते याकडे लक्ष दिले जावे. 

अशोक मुर्तडक - माझ्या महापौरपदाच्या कार्यकाळात चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कची उभारणी करण्यात आली. महापालिकेच्या शाळांकडे आम्ही नियमित लक्ष देतो. अशाच पद्धतीने नगरसेवकांनी शाळांकडे लक्ष द्यावे. वाहतुकीच्या प्रश्‍नाचे निराकारण करावे. सत्यता आणि विश्‍वासार्हता हीच लोकप्रतिनिधींची ओळख असते, हे तितकेच खरे आहे. 

लोकप्रतिनिधी म्हणाले... 
अजय बोरस्ते - नाशिकच्या विकासासाठी आम्ही सारे जण कटिबद्ध आहोत. शहराचा विकास "हॉरिझॉन्टल' पद्धतीने होत आहे. त्यामुळे यापुढील काळात आपणाला कौशल्यविकासावर भर द्यावा लागेल. त्याच वेळी महापालिकेच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, यावर लक्ष द्यावे लागेल. 

शशिकांत जाधव - खेड्यांमधील स्थलांतर वाढले आहे. पण अजूनही स्थानिकांनी गावपण टिकवून ठेवले. खेडी विकासप्रमाणे इतर योजनांचा निधी खेड्यांसाठी द्यावा लागेल. महिलांना रोजगार उपलब्धतेसह त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठेसाठी लक्ष द्यावे लागेल. महापालिका आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचा समन्वय साधून शहरासाठी आवश्‍यक असलेले पन्नास हजार गवंडी उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करता येईल. 

डॉ. दीपाली कुलकर्णी - एका बाजूला उच्चभ्रू वस्ती आणि हाकेच्या अंतरावर सुविधांची वानवा, अशी परिस्थिती आमच्या प्रभागात आहे. जुन्या वडाळागावात रस्ते झाले आहेत. पण वडाळ्याच्या दक्षिण भागात रस्ते, वीज, पाणी हे प्रश्‍न मार्गी लावावे लागतील. आम्ही चारही नगरसेवक अडीच वर्षे आमचा निधी या भागातील विकासासाठी देणार आहोत. खेडी विकासासाठी निधी मिळावा. आयुक्त हे प्रभागनिहाय दौरा करत आहेत. त्यांनी आमच्या प्रभागाला भेट देऊन स्थानिक प्रश्‍न पाहावेत, अशी विनंती या बैठकीच्या निमित्ताने करते. 

विलास शिंदे - आयुक्तांनी प्रभागाचा दौरा करत लोकप्रतिनिधींना बोलावून घेत समस्यांचे निराकारण केले आहे. आता पायाभूत सुविधांसाठी खेडी विकास निधी वाढवावा लागेल. त्याच वेळी शेती उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 

सतीश सोनवणे - प्रभाग 30 मधील वडाळागावातील भंगार गुदामे स्थलांतरित होत आहेत. दिलीप दातीर यांनी परिश्रम घेऊन त्यांच्या भागातील भंगारविषयक प्रश्‍न मार्गी लावला आहे. तशी वेळ आमच्यावर येऊ नये. वडाळागावातील भंगार दुकानांचा प्रश्‍न मार्गी लावणे अत्यंत आवश्‍यक आहे. 

प्रशांत दिवे - प्रत्येक खेड्याचा सिटी सर्व्हे आवश्‍यक आहे. गायरान महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्याचा विकास व्हावा. 

भगवान दोंदे - पाथर्डी गाव, दाढेगाव, पिंपळगाव बहुलाच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. दाढेगावच्या दळवळणाचा प्रश्‍न मिटण्यासाठी रस्त्यावर पूल व्हावा. 

सत्यभामा गाडेकर - गावठाणातील विकासामध्ये चटई क्षेत्र वाढवून दिले जावे. पाथर्डी फाटा ते पुणे महामार्गापर्यंत विकास आराखड्यानुसार रस्त्याचा विकास करून बाजूने मेट्रो सुरू करणे शक्‍य आहे. रस्त्यांच्या विस्तारीकरणासाठी शेतकऱ्यांच्या लागणाऱ्या जागेसाठी बाजारमूल्य दराप्रमाणे शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी. देवळालीमधील 1962 च्या यशवंत मंडईचा विकास व्हावा. वालदेवी नदीवर विहितगाव, देवळाली गावासाठी पथमार्ग उभारला जावा. पिंपळगाव बहुला ते नाशिक या जुन्या वाटेचे काम व्हावे.

Web Title: nashik news nashik municipal corporation development