गोदावरीच्या पाण्यातून संपेल नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

नाशिक - नार- पार- नर्मदा, दमणगंगा- पिंजाळ खोऱ्यातील पाण्यासंबंधीचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्यातून महाराष्ट्राला स्वतःच्या हक्काचे पाणी मिळेल. त्याव्यतिरिक्त दमणगंगा खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात 25 ते 30 टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यातूनच नाशिक- नगर विरुद्ध मराठवाडा हा संघर्ष संपेल. नाशिक जिल्ह्यातील कमी पावसाच्या सगळ्या तालुक्‍यांना पाणी मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

राज्यातील 41 बसस्थानके अत्याधुनिक करण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बसपोर्टचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी नद्याजोड प्रकल्पासाठीच्या उत्तम आराखड्याचे श्रेय महाजन यांना दिले. तसेच, नद्याजोड प्रकल्पासाठी निधीचा आग्रह केंद्राकडे धरला असून, केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

गुजरातमध्ये बसपोर्ट झाले; पण आता महाराष्ट्रही मागे राहणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की प्रत्येक शहरामध्ये "इंटिग्रेटेड बसपोर्ट' उभारले जाणार आहेत. पुण्यातील स्वारगेट बसस्थानक याच धर्तीवर उभारत शहर आणि एसटी बसगाड्या, मेट्रो, टॅक्‍सी आदींना सामावून घेतले जाईल. प्रत्येक गोष्ट बसपोर्टमध्ये मिळेल अशी व्यवस्था करताना, सायंकाळचे भोजन बसपोर्टमधील रेस्टॉरंटमध्ये करण्याचा मोह आवरणार नाही, इतपत त्यास महत्त्व राहील. त्याचवेळी गरीब आणि मध्यमवर्गीयांना उत्तम सुविधा देण्यात येतील. एसटी बस आरामदायी करत कमी खर्चात प्रवासाची सोय केली जाईल.

कामगारांचा करार दिवाळीपर्यंत
राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असूनही श्रमाला न्याय देण्यासाठी कामगारांचा वेतनकरार दिवाळीपर्यंत केला जाईल, त्यातून कामगारांचे समाधान होईल. पण, थोडासा हट्ट सोडण्याची भूमिका घ्यावी लागेल, असे सांगून रावते म्हणाले, की मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहे उपलब्ध व्हावीत म्हणून बसस्थानकांच्या परिसरात राज्यात 60 ठिकाणी चित्रपटगृहे उभारण्यात येतील. याशिवाय, येत्या 3 महिन्यांत दीड हजार शिवशाही बसगाड्या लांबपल्ल्यासाठी धावतील. बसस्थानकांच्या अत्याधुनिकीकरणात "बीओटी' आम्ही हद्दपार केली असून, व्यापाऱ्यांना जागा दिली जाणार नाही. राज्यात 14 आंतरराष्ट्रीय बसपोर्ट उभारणार असून, त्यातील एका बसपोर्टचा भूमिपूजन सोहळा स्वतंत्रपणे होईल.

Web Title: nashik news Nashik vs Marathwada conflict will end in Godavari waters