बहात्तरच्या दुष्काळातील विहिरीला वीजजोडणी नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नाशिक - 1972 चा दुष्काळ आठवला तर अनेकांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. या दुष्काळावेळी सुविधेसाठी विहीर खोदली; परंतु आजही वीजपंपाच्या जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या बाबूराव पागेरे यांनी सोमवारी जनता दरबारात गाऱ्हाणे मांडले.

नाशिक - 1972 चा दुष्काळ आठवला तर अनेकांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. या दुष्काळावेळी सुविधेसाठी विहीर खोदली; परंतु आजही वीजपंपाच्या जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या बाबूराव पागेरे यांनी सोमवारी जनता दरबारात गाऱ्हाणे मांडले.

विविध समस्यांसाठी दाद मागण्यासाठी जनता दरबारात नांदगाव बुद्रुक (ता. इगतपुरी) येथील बाबूराव पागेरे एक कोपरा धरून आपला क्रमांक येण्याच्या प्रतीक्षेत होते. गेल्या 45 वर्षांपासून सुरू असलेल्या समस्येच्या पाठपुराव्याला आज तरी यश येईल, या आशेने ते आले होते. पागेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळावेळी त्यांनी कर्ज काढून विहीर खोदली. त्यांच्या नजीकच सामुदायिक विहीरही खोदण्यात आली. विहीर खोदल्यानंतर वीजपंपासाठी जोडणीसाठी अर्ज केला.

तेव्हा "एमएसईबी'च्या कार्यालयात अर्ज केल्यानंतर वीजजोडणीचे आश्‍वासन देण्यात आले. नंतरच्या कालावधीत वीजजोडणी तर झाली नाहीच; परंतु बिले पाठविण्यात आली. ही बिले भरा, तुमची वीजजोडणी करू, असे आश्‍वासन दिले गेले. दोन बिलांची रक्‍कम भरूनही वीजजोडणी झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पन्नास लाखांच्या भरपाईची मागणी
वीजजोडणी नसतानाही बाबूराव पागेरे यांना वेळोवेळी वीजबिलेही पाठवली गेली. मीटर नसताना त्यांनी एक-दोन बिलेदेखील भरली, पण अद्याप वीजजोडणी झालेली नाही. या प्रकारामुळे शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे सांगून तब्बल पन्नास लाखांची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा पागेरे यांनी व्यक्‍त केली.

Web Title: nashik news no electricity connection for well