सामाजिक विषयांनी गाजविला दिवस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

नाशिक - विवाहबाह्य संबंध, धर्माधर्मातील निरर्थक द्वेष, मानवी कल्पनांची गुंतागुंत, उद्याची चिंता न करता जगणे, अशा विविध विषयांवरील एकांकिकांनी मंगळवारचा (ता. 16) दिवस गाजवला. सर्वच एकांकिकांना रसिकांनी दाद दिली. 

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बाबाज्‌ थिएटर आणि एम्सतर्फे सुरू असलेल्या बाबाज्‌ करंडक एकांकिका स्पर्धेत मंगळवारी पाच एकांकिकांचे सादरीकरण झाले. 

नाशिक - विवाहबाह्य संबंध, धर्माधर्मातील निरर्थक द्वेष, मानवी कल्पनांची गुंतागुंत, उद्याची चिंता न करता जगणे, अशा विविध विषयांवरील एकांकिकांनी मंगळवारचा (ता. 16) दिवस गाजवला. सर्वच एकांकिकांना रसिकांनी दाद दिली. 

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बाबाज्‌ थिएटर आणि एम्सतर्फे सुरू असलेल्या बाबाज्‌ करंडक एकांकिका स्पर्धेत मंगळवारी पाच एकांकिकांचे सादरीकरण झाले. 

कृपा शैक्षणिक, सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे "बायकोच्या नवऱ्याच्या बायकोचा खून' ही ऋषीकेश चौधरी लिखित आणि पूनम चौधरी दिग्दर्शित एकांकिका सादर करण्यात आली. नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, त्यातून त्याचे संसाराकडे होणारे दुर्लक्ष, त्याला बायकोने घडवलेली अद्दल यातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्तिकेय पाटील, पूनम चौधरी, रामेश्‍वर धापसे, प्रतीक गुंजाळ, हेरंब कुलकर्णी यांच्या भूमिका होत्या. 

ल्यूमिनस फाउंडेशन (नाशिक) यांच्यातर्फे श्रीराम वाघमारे लिखित व विक्रम गवांदे दिग्दर्शित "परिवर्तन' एकांकिका सादर करण्यात आली. यात माणसातील व्याभिचारी वृत्तीचा सूड घेणाऱ्या युवतीची कथा मांडण्यात आली. एकांकिकेची निर्मिती अनघा घोडपकर यांची होती. अमोल थोरात, केतकी कुलकर्णी, रोशनी पन्हाळे, पल्लवी ओढेकर, सुयश लोथे, गौरव गाजरे यांनी भूमिका साकारल्या. पुण्याच्या नाट्यविश्‍व थिएटरतर्फे प्राजक्त देशमुख लिखित व दीपक महाजन दिग्दर्शित "रेनमेकर' एकांकिका सादर झाली. उद्याची पर्वा न करता वर्तमानकाळात दिलखुलास जगण्याचा संदेश देण्यात आला. निखिल ठाकूर, मनाली धात्रक, श्रद्धा मालोकर, प्रणव वाघ, सुहास संत, राहुल राजपूत आदींच्या भूमिका होत्या. धुळे येथील एनएडी स्टुडिओतर्फे "विवर' ही एकांकिका सादर करण्यात आली. एकांकिकेचे लेखन इरफान मुजावर यांचे असून, दिग्दर्शन प्रेरणा चंद्रात्रे यांचे होते. आकांक्षा चंद्रात्रे व वृषाली रकिबे यांच्या भूमिका होत्या. सप्तशृंगी शिक्षण संस्थेतर्फे सुयोग देशपांडे लिखित व बाळकृष्ण तिडके दिग्दर्शित "रणमर्द' एकांकिकेत मानवी कल्पनांच्या गुंतागुंतीचा प्रवास सादर करण्यात आला. कुणाल पेठकर, सागर येलमामे, क्रांती बच्छाव, महेंद्र चौधरी, करिष्मा देसले, बाळकृष्ण तिडके यांनी भूमिका केल्या. 

आज (ता. 17) सादर होणाऱ्या एकांकिका 
दु. 4 ः दहा किलोमीटर 
सायं. 5 ः अभंग 
सायं. 6 ः सरप्राइज 
सायं. 7 ः ओरिगामी 

Web Title: nashik news one act play drama