पुरामुळे सहाशे रुपयांनी कांदा गडगडला

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नाशिक - बिहार अन्‌ आसाममधील पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातून पाठविण्यात आलेला सोळा हजार टन कांदा रस्त्यात अडकून पडल्याने नाशिक जिल्ह्यात एका आठवड्यात कांद्याच्या भावात क्विंटलमागे ६०० रुपयांनी घसरण झाली.

नाशिक - बिहार अन्‌ आसाममधील पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातून पाठविण्यात आलेला सोळा हजार टन कांदा रस्त्यात अडकून पडल्याने नाशिक जिल्ह्यात एका आठवड्यात कांद्याच्या भावात क्विंटलमागे ६०० रुपयांनी घसरण झाली.

पश्‍चिम बंगाल आणि आसामच्या सीमा भागात दहा हजार टन कांद्याचे पाचशेहून अधिक ट्रक जागेवर उभे आहेत. साडेसहा हजार टन कांद्याचे रेल्वेगाड्यांचे चार रेक बाजूला उभे करण्यात आले आहेत. खरिपासाठी पोळ्याच्या अगोदर रोपे टाकून पुनर्लागवड केली जाते. यंदा कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी वेळेत रोपे टाकली नाहीत. चांगला भाव मिळू लागल्याने आता रोपे टाकण्यास सुरवात झाली असून, त्यांची पुनर्लागवड पुढच्या महिन्याच्या अखेरीस होईल. त्यानंतर नवीन कांदा बाजारात येण्यास सुरवात होईल. सध्या आंध्रातील कर्नुल भागातून नवीन कांदा बाजारात येत आहे. मात्र, त्याचे उत्पादन कमी असल्याने त्याचा फारसा परिणाम महाराष्ट्रातील कांद्याच्या भावावर होणार नाही, असे बाजारपेठ अभ्यासकांचे म्हणणे आहे. ही सारी स्थिती पाहता, आगामी काळात महाराष्ट्रातील कांदा भाव खाणार हे स्पष्ट झालेले असताना, नैसर्गिक आपत्तीने भावाला ‘ब्रेक’ लावला आहे. बांगलादेशात पुरामुळे कांदा पोचणे सद्यःस्थितीत अशक्‍य आहे.

लासलगावमध्ये गुरुवारी (ता. १०) क्विंटलभर कांद्याला सरासरी दोन हजार ४५० रुपये भाव मिळाला होता. आज हाच भाव एक हजार ८५० रुपयांपर्यंत निघाला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एक हजार ८८० रुपयांवरून आज दोन हजार ४१० रुपये क्विंटल, असा सरासरी भाव पोचला होता. हा अपवाद वगळता देशातील इतर बाजारपेठेतील बाजारभावात घसरण झाली. देशातील इतर बाजारपेठांमधील क्विंटलभर कांद्याचा १० ऑगस्टचा अन्‌ आजचा भाव रुपयांत असा ः औरंगाबाद ः दीड हजार- १ हजार ४००, चंडीगडः २ हजार १५०- २ हजार ५०, देवळा ः अडीच हजार- १ हजार ८५०, धुळे ः २ हजार १००- १ हजार ७५०, मथुरा ः २ हजार २५०- १ हजार ८००, नागपूर ः २ हजार ३००- २ हजार १००, श्रीनगर ः तेराशे- बाराशे, सुरत ः २ हजार ६२५- २ हजार ५०, वाराणसी ः २ हजार ४००- २ हजार २८०. सध्या जिल्ह्यातील बाजारपेठांत सव्वालाख क्विंटल कांदा दिवसाला विक्रीसाठी येत आहे. भावात आणखी घसरण होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी साठवणुकीतील उन्हाळ कांदा विक्रीसाठी आणणे पसंत केले आहे.

दिल्लीत कांद्याचा भाव ५० रुपये किलोपर्यंत धडकण्याची शक्‍यता ग्रहीत धरून त्यावरील उपाययोजनांना सुरवात झाली आहे. सद्यःस्थितीत ‘नाफेड’ने नाशिक जिल्ह्यातील बाजारातून कांदा विकत घेऊन दिल्लीत ३० ते ३५ रुपये किलो भावाने विकण्यासंबंधीचा विचार सुरू आहे. निर्यात किमान मूल्य शून्यवरून टनाला ४०० ते ४५० डॉलर करणे आणि निर्यातीसाठी देण्यात येत असलेले ५ टक्के अनुदान रद्द करण्यासंबंधी सरकार विचार करत आहे. निर्यातीचे किमान मूल्य जागतिक बाजारपेठेत ३०० ते ३५० डॉलरपर्यंत आहे. तरीही त्याचा देशांतर्गत बाजारपेठेतील भावावर फारसा परिणाम होण्याची शक्‍यता सध्या दिसत नाही.
- चांगदेवराव होळकर, माजी अध्यक्ष, नाफेड

Web Title: nashik news onion