कांद्याचे भाव 35 टक्‍क्‍यांनी कोसळल्याने शेतकरी हैराण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी 400-500 रुपयाने कांद्याचे विक्री करीत होते, तेव्हा सरकार झोपले होते का? तेव्हा सरकारने का हस्तक्षेप केला नाही? कांदा ही काही जिवनावश्‍यक वस्तू नाही. त्यामुळे दोन-तीन महिने थोडासा अधिक दराने कांदा खरेदी करावा लागला, तर फारसा फरक पडणार नाही. 
- चांगदेवराव होळकर, "नाफेड'चे माजी सदस्य. 

नाशिक - प्राप्तिकर विभागाने पिंपळगाव बसवंत, लासलगाव व उमराणे येथील मोठ्या व्यापाऱ्यांवर छापे टाकल्यानंतर कांद्याचे भाव 35 टक्‍क्‍यांनी घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील दोन वर्षांपासून 400-500 रुपये क्विंटलने कांद्याची विक्री केल्यानंतर आता कुठे भरे भाव मिळत असताना सरकारने भाव पाडण्यासाठीच छापे टाकल्याची संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांतील कांद्याचे लिलाव सोमवारपर्यंत (ता.18) बंद राहणार आहेत. त्यामुळे आधीच चाळीत खराब होत चाललेला कांदा आणखी खराब होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

कांदा उत्पादकांना गेल्या दीड वर्षांपासून क्विंटलला 400 ते 500 रुपये दर मिळत असताना सरकारने कुठलाही हस्तक्षेप न करता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. आता दीड-दोन महिन्यांपासून कांद्याला बरे दर मिळायला लागल्यानंतर सरकारने बाजारात हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कांद्याचे दर कमी करण्यासाठी आयातीला परवानगी दिली. त्यामुळे कांद्याच्या दरावर थोडासा परिणाम झालाही, परंतु सरकारचे समाधान होण्यास तयार नसल्याने त्यांनी कांद्याच्या साठेबाजीच्या नावाखाली पिंपळगाव बसवंत, लासगलाव व उमराणे या बाजार समित्यांमधील प्रमुख व्यापाऱ्यांवर छापे टाकून त्यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप होत आहे. या छाप्यानंतर बाजार भाव क्विंटलमागे 600 रुपयांनी कोसळल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव झालेला कांदा परत नेणे पसंत केले. व्यापाऱ्यांनीही तीन दिवस लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच परतीच्या पावसामुळे चाळीतील कांदा वेगाने खराब होत असतानाच लिलाव बंद असल्यामुळे चाळीतील कांदा सडून व भाव कोसळून आणखी नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. 

Web Title: nashik news onion

टॅग्स