निर्यातमूल्य वाढवूनही कांदा निर्यातीमुळे केंद्र सरकार चक्रावले

निर्यातमूल्य वाढवूनही कांदा निर्यातीमुळे केंद्र सरकार चक्रावले

नाशिक - देशांतर्गत कांद्याच्या भाववाढीमुळे केंद्र सरकारने टनाचे निर्यातमूल्य ८५० डॉलर केले आहे. या निर्णयानंतरही कांद्याची निर्यात होत असल्याने केंद्र सरकार चक्रावले आहे. सद्यःस्थितीत कांद्याचे आगर असलेल्या लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात चढ-उतार सुरू असून, क्विंटलचा सरासरी भाव तीन हजार रुपयांच्या पुढे आहे. शिवाय जिल्ह्यातून दिवसाला ८० टन कांदा दिल्लीला अन्‌ दिवसाआड २० टन कांदा चेन्नईला रवाना होत आहे.

कोलंबो, मलेशिया, दुबई, फिलिपीन्स, बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात होत असून, बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्यापैकी २५ टक्के कांदा निर्यातीसाठी पाठविण्यात येत आहे. उरलेला ७५ टक्के कांदा देशांतर्गत बाजारपेठेकडे रवाना होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पश्‍चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. दरम्यान, दिल्लीकरांसाठी लासलगावमधून ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदी केला जात असून, तो मदर डेअरीच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. यंदाच्या खरीप आणि लेट खरीप कांद्याच्या उत्पादनाचे वेळापत्रक बदलत्या हवामानामुळे कोलमडले आहे. खरिपाचा कांदा सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत, तर लेट खरिपाचा कांदा १५ डिसेंबरपासून मार्चपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होत असतो. यंदाच्या खरिपामध्ये देशामध्ये उत्पादित होणाऱ्या ४२ लाख टन कांद्यापैकी प्रत्यक्षात ३० लाख टनांपर्यंत उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. शिवाय लेट खरिपाच्या उत्पादनात दहा लाख टनांची घट येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

लेट खरीप अर्थात, रांगड्या कांद्याचे उत्पादन महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थानमध्ये होते. इतर राज्यांतील कांदा बाजारात येण्यास आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दिवसाला सर्वसाधारणपणे अडीच लाख क्विंटल विक्रीसाठी येत आहे. डिसेंबरमध्ये भाव कोसळत असल्याने शेतकरी असंतोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरतात, असा यापूर्वीचा अनुभव आहे. मात्र सध्या तरी ही स्थिती तयार होईल, असे चित्र पाहावयास मिळत नाही. 

लासलगावमध्ये तीन हजार ते तीन हजार ४००, तर पिंपळगाव बसवंतमध्ये तीन हजार ते तीन हजार ३०० रुपये क्विंटल असा भाव कांद्याला मिळाला आहे. आग्रा येथे तीन हजार ३५०, बेंगळुरूमध्ये तीन हजार ९२५, दिल्लीमध्ये दोन हजार ३८८, हुबळीमध्ये दोन हजार १००, तर कर्नुलमध्ये तीन हजार २०० रुपये क्विंटल या सरासरी भावाने दोन दिवसांपूर्वी कांदा विकला गेला आहे.

निर्यातमूल्याचा विचार करता, ९२५ डॉलर टनापर्यंत पोचचा कांद्याचा भाव जातो. अशाही स्थितीत निर्यात कशी होते, अशी विचारणा ‘नाफेड’तर्फे करण्यात आली. त्यावरून सरकार कांद्याच्या निर्यातीसंबंधी काळजीत पडल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याच्या माध्यमातून निराळ्या प्रकारचे व्यवहार होत नाहीत ना, हे तपासण्याची आवश्‍यकता आहे.
- चांगदेवराव होळकर, माजी अध्यक्ष, नाफेड

उन्हाळ कांद्याची लागवड सुरू
उन्हाळ कांद्याच्या लागवडीसाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी रोपे तयार केली आहेत. या रोपांची पुनर्लागवड शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. ही पुनर्लागवडीची कामे जानेवारीअखेरपर्यंत चालतील. मात्र रोपांच्या पुनर्लागवडीसाठी येणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. पाच ते सहा हजार रुपये एकरी येणारा खर्च आठ ते नऊ हजार रुपयांपर्यंत पोचल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

लासलगावमधील पाच वर्षांतील कांदा भावाची स्थिती
वर्ष           आवक    सरासरी

२०१३-१४    ४.५०    १ हजार ३२६
२०१४-१५    २.९६    १ हजार ५२४
२०१५-१६    ४.३९    १ हजार १६३
२०१६-१७    ४.२६    ७०९
२०१७-१८ (१२ डिसें.पर्यंत)    २.४४    २ हजार ९९७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com