‘पांजरपोळ’च्या दुधाची कुपोषणावर मात्रा

अरुण मलाणी
सोमवार, 22 जानेवारी 2018

गेल्या साठ वर्षांपासून गरीब मुलांना दूधवाटप करत कुपोषणाच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. सामाजिक कार्याला दात्यांचेही सहकार्य लाभते. शिवाय शेतकऱ्यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध केल्याने आता चार पैसे कमाविण्याची संधी संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.
- तुषार पालेजा, व्यवस्थापक, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ

नाशिक - श्री नाशिक पंचवटी पांजरपोळची उत्पादने परिचित आहेत. या संस्थेतर्फे साठ वर्षांपासून अनोखा उपक्रम राबविण्यात येतोय. तो म्हणजे, दरररोज सायंकाळी साडेपाचला पंचवटीमधील आर्थिकदृष्ट्या मागास वस्त्यांमधील बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना शंभर मिलीलिटर गरम दूध, बिस्कीट पुडा अन्‌ भेळभत्ता, केळी असा सकस आहार मोफत दिला जातो. दररोज शंभर मुले त्याचा लाभ घेताहेत. पांजरपोळचे दूध कुपोषणनिर्मूलनासाठी चांगली मात्रा ठरलंय. 

संस्थेची १९७८ मध्ये स्थापना झाली. बाराशे गायींना आश्रय देणाऱ्या संस्थेत अडीचशे दुभत्या गायी आहेत. शेतकऱ्यांना वयोवृद्ध गायी सांभाळण्याचा खर्च परवडत नसल्याने संस्थेतर्फे त्यांचा सांभाळ केला जातो. संस्थेच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने ‘गोपाल रत्न’ पुरस्काराने गौरवले आहे. सामाजिक जाणीव जपणाऱ्या संस्थेतर्फे एकाही दिवसाचा खाडा पडू न देता मोफत सकस आहार वाटला जातो. या उपक्रमांतर्गत मुलांना संस्थेच्या प्रांगणात दररोज साखर घातलेले गरम दूध दिले जाते. उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर दात्यांचे सहकार्य वाढू लागले. त्यातून दूध-बिस्किटाच्या जोडीला कधी आइस्क्रीम; तर इतर चविष्ट खाऊचे वाटप केले जाते. 

जागेवर दूध पिण्याची अट
कुपोषणनिर्मूलनाच्या हेतूने वाटप केल्या जाणाऱ्या दुधाचा वापर चहा अथवा इतर कारणांसाठी होऊ नये म्हणून दूध घरी नेऊ दिले जात नाही. मुलांना संस्थेच्या आवारात गरमागरम दूध प्यावे लागते. या उपक्रमांतर्गत मुलांचे आरोग्य सुधारत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकेकाळी उपक्रमात सहभागी झालेले आज सरकारी सेवेत उच्चपदस्थ आहेत. या उपक्रमामुळे आरोग्य ठणठणीत होऊन यश मिळवित आल्याचे संस्थेच्या भेटीदरम्यान अनेक वेळा खुलेपणाने सांगतात.

शेतकरी बाजारसाठी दिली जागा
संस्थेने शेतकऱ्यांसाठी आणखी अभिनव उपक्रम राबवला. मखमलाबाद मार्गावरील ‘ड्रीम कॅसल’जवळील चौकात ट्रस्टचा मोकळा भूखंड शेतकऱ्यांना बाजार भरविण्यासाठी दिला. पणन मंडळाकडे नोंदणीकृत शेतकऱ्यांना कुठलेही शुल्क न आकारता ही जागा उपलब्ध करून देण्यात आली. इथे शेतकरी थेट शेतमालाची विक्री ग्राहकांना करतात.

Web Title: nashik news panjarpol milk malnutrition child