आई-वडिलांना न सांभाळणाऱ्यांचा नगरप्रमाणे नाशिकमध्येही पगार कापा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

सामाजिक प्रश्‍नांची धग 
घसघशीत निवृत्तिवेतन मिळेपर्यंत सांभाळ आनंदात 
खासगी क्षेत्रातून निवृत्तीनंतरची पुंजी खर्च होईपर्यंतच सांभाळ
संपत्तीची वाटणी होताच ज्येष्ठांच्या नशिबी त्रास 
गंभीर आजारानंतर सरकारी, धर्मदाय रुग्णालयात सोडून देतात

नाशिक - आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या शिक्षकांच्या वेतनातून ३० टक्के कपात करून माता-पित्यांना देण्याचा ठराव नगर जिल्हा परिषदेने केलाय. हाच कित्ता नाशिक जिल्हा परिषदेनेही गिरवावा, अशी अपेक्षा व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांनी या धोरणाची सरकारी-निमसरकारी विभागांमध्ये अंमलबजावणी व्हायला हवी, असा आग्रह धरलाय.

सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळत असल्याने त्यांचा सांभाळ कुटुंबांमध्ये कुरकूर होऊनही होतो. मात्र खासगी क्षेत्रातील अल्प निवृत्तिवेतन मिळणाऱ्यांकडे उतारवयात कानाडोळा केला जातो. पूर्वी मुंबई-पुण्यापुरते असलेले हे लोण नाशिकमध्येही पसरले. विशेष म्हणजे, उच्चशिक्षित अन्‌ चांगले वेतन मिळणाऱ्या कुटुंबातील कर्तीमंडळी समाजकल्याण कार्यालयात येऊन वृद्धाश्रमांचे पत्ते विचारताना दिसतात. वाढत्या मागणीमुळे नाशिकमध्ये पाच खासगी वृद्धाश्रम सुरू झालेत. वृद्धाश्रमांऐवजी शुश्रुषा केंद्र असे संबोधण्यात आले. चालता-बोलता येणाऱ्या निरोगी ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी सात हजार ते नऊ हजार रुपये महिना शुल्क भरून प्रवेश दिला जातो. आजारपण जडलेल्यांना सांभाळण्यासाठी दरमहा १५ हजार रुपये द्यावे लागतात. सरकारी वृद्धाश्रम मात्र आता नावालाच उरलेत. इथे गरजू गरीब वृद्धांना राहू देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना पाठपुरावा करावा लागतो.

‘नाठाळांच्या माथी, हाणावी काठी’ ही संत तुकोबांची उक्ती आवश्‍यक आहे. तरीपण या निर्णयाप्रत पोचण्याअगोदर शिक्षकांकडून आपल्या आई-वडिलांचा सांभाळ का केला जात नाही, हे पाहणे गरजेचे आहे. बहुतांशवेळी भाऊबंदकी, हेकेखोरपणा अशी कारणे त्यामागे असतात. एखाद्याला वडिलोपार्जित हिस्सा मिळत नाही तेव्हा असे वाद उद्‌भवतात.
- विकास कवडे, सप्तशृंग ज्येष्ठ नागरिक संघ, गंगापूर रोड  

नगर जिल्हा परिषदेचा ठराव नगरपुरता मर्यादित न राहता राज्यभर असे ठराव झाले पाहिजेत. केवळ शिक्षकच नव्हे, तर सर्वच विभागांत त्याची अंमलबजावणी व्हावी. कारण ८० टक्के आई-वडिलांना त्रास होऊनही ते मुलांबाबत तक्रार करत नाहीत. त्यातून त्यांची उतारवयात हेळसांड होते.
- रमेश जाधव, पंचवटी 

नगरसारखा निर्णय नाशिक विभागात सर्वत्र व्हावा, अशी मागणी आपण शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करणार आहोत. मुळातच, काळाची गरज ओळखून वृद्धाश्रम बंद पडेपर्यंत अशा निर्णयांची अंमलबजावणी अपेक्षित आहे.
- प्रकाश बोरसे, निवृत्त शिक्षक, सिडको

नगर जिल्हा परिषदेचा ठराव स्तुत्य अन्‌ अनुकरणीय आहे. मुलांनी ज्येष्ठांचा सांभाळ केलाच पाहिजे. आम्ही बऱ्याचदा रुग्णालयांमध्ये ज्येष्ठांची दयनीय अवस्था पाहत असतो. मुले अनेकदा ज्येष्ठांना सोडून जातात. घर अथवा स्थावर मालमत्ता मुलांच्या नावावर हस्तांतरित होताच, हेळसांड सुरू होते.
- डॉ. एल. एस. बागडे, ज्येष्ठ नागरिक संघ, नाशिक रोड

Web Title: nashik news Parents social