"महसूल'चे शिक्कामोर्तब, तरीही पोलिस साशंकच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नाशिक - कोलंबिका जमीन गैरव्यवहारप्रकरणी शासकीय पातळीवर विविध स्तरांवर तत्कालीन अनियमिततेवर शिक्कामोर्तब होत असताना, ग्रामीण पोलिसांच्या तपासाला मात्र ही शासकीय अनियमितता बहुधा मान्य नसावी. परिणामी अद्याप एकाही संशयिताला पोलिसांकडून अटक झालेली नाही. 

नाशिक - कोलंबिका जमीन गैरव्यवहारप्रकरणी शासकीय पातळीवर विविध स्तरांवर तत्कालीन अनियमिततेवर शिक्कामोर्तब होत असताना, ग्रामीण पोलिसांच्या तपासाला मात्र ही शासकीय अनियमितता बहुधा मान्य नसावी. परिणामी अद्याप एकाही संशयिताला पोलिसांकडून अटक झालेली नाही. 

त्र्यंबकेश्‍वरमधील कोलंबिका देवस्थानच्या जमीन गैरव्यवहारात कुळबदलात अनियमिततेबद्दल तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार शासकीय कर्मचाऱ्यांसह संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले. पाठोपाठ आता महसूलमंत्र्यांनी जुना आदेश रद्द ठरविला. एकानंतर एक विविध पातळ्यांवर कोलंबिका जमीन गैरव्यवहारातील अनियमिततेवर शासकीय शिक्कामोर्तब होत असले, तरी पोलिसांना हे मान्य नसावे. त्यामुळेच की काय, अजूनही या प्रकरणात एकाही संशयिताच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न दिसत नाहीत. त्यामुळेच आता त्र्यंबकेश्‍वर पोलिसांच्या कारवाईवर शंका व्यक्त होऊ लागली आहे. 

त्र्यंबकेश्‍वरला कोलंबिका देवस्थानच्या 185 एकर जमिनीवर कुळबदलात अनियमितता झाली. शासकीय परवानगी न घेताच आधी देवस्थानचे कुळ बदलून, त्यानंतर देवस्थानचे नाव काढून जमिनीवर मालकीहक्क दाखविण्याचा गंभीर घोटाळा झाला. बाजारभावानुसार सुमारे 200 कोटींच्या या जमीन गैरव्यवहारात शासकीय नियम वाकवून गैरव्यवहाराच्या या प्रकारात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार फौजदारी गुन्हे दाखल झाले. विविध पातळ्यांवर त्याची चौकशी सुरू झाली. गैरव्यवहारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी शासकीय आदेश झाले. महसूलमंत्र्यांकडे सुनावणी होऊन त्यातील अनियमिततेवर शिक्कामोर्तब झाले. 

वास्तविक सकृतदर्शनी शासनाच्या नियमांची मोडतोड करीत सुमारे 200 कोटींच्या जमीन घोटाळ्यासारख्या गंभीर प्रकरणात त्र्यंबकेश्‍वरच्या ग्रामीण पोलिसांच्या तपासाला समांतर स्वरूपात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फेही या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकाराची चौकशी करण्याची गरज असताना, नेमक्‍या उलट्या पद्धतीने ग्रामीण पोलिसांची कासवगतीने चौकशी सुरू आहे. जणू गैरव्यवहार प्रकरणातील संशयितांना अधिकाधिक वेळ कसा मिळेल अशाच पद्धतीने हे प्रकरण हाताळले जाते की काय, अशी शंका यावी इतक्‍या ढिम्मपणे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे शासकीय निर्णयापेक्षा पोलिस यंत्रणेच्या या तपासाविषयी आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

Web Title: nashik news police colombica Land fraud Case