आक्रमक विरोधक अन्‌ हतबल सत्ताधारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

नाशिक - महापालिकेच्या सभागृहात पक्षाचे बहुमत असले तरी अनुभवापुढे सारे काही थिटे पडते, याचा अनुभव आज सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आला. सभागृहात विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी अनुभवी नगरसेवकांची मोठी फळी असल्याने भाजपला वारंवार घेरण्यात सातत्याने यश येत असल्याने बहुसंख्याक भाजपवर विरोधक भारी पडत आहेत.

छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा सभागृहात लावण्यावरून विरोधी गटातील नगरसेवकांनी भाजपला जेरीस आणण्याची खेळलेली खेळी व निमूटपणे प्रतिमा स्वीकारताना उडालेली भंबेरी आज त्याचेच एक उत्तम उदाहरण ठरले.

विविध विषयांवर बोलाविलेली महासभा आज विषय समित्या व पावसाळी गटार योजनेवर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवरून गाजणार हे स्पष्ट होते. परंतु, बडगुजर यांना सभागृहात येण्यास उशीर होणार असल्याचे जाहीर केल्याने ते येण्याच्या आत या विषयावर बोलून विषय संपविण्याचा सत्ताधारी भाजपचा प्रयत्न होता; परंतु विरोधकांनी भाजपचा हा प्रयत्न विविध प्रकारच्या क्‍लुप्त्या लढवून हाणून पाडला.

विरोधकांकडून बडगुजर यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करण्याची मागणी होताच, सत्ताधारी गटाकडून सेंकदात सुटणारे विषय चर्चेला आणून वेळ मारून नेली जात होती. सर्वांत चर्चेचा विषय ठरला, तो नगरसेवक प्रशांत दिवे यांच्या भाषणाचा. अंदाजपत्रकीय महासभेत दिवे यांनी सभागृहात आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांची प्रतिमा लावण्याची मागणी केली.

अद्यापपर्यंत छायाचित्र लागले नाही, त्याच अनुषंगाने दिवे यांनी भाषणाला सुरवात केली. १९०२ पासून आरक्षणाचा इतिहास त्यांनी मांडला. विषय सभागृहात छायाचित्र लावण्याचा असताना त्यावर दिवे यांनी लांबलचक भाषण केल्याने त्यांचे भाषण मानसिक त्रास देणारे ठरले. त्यावर महापौरांनी नाराजीदेखील व्यक्त केली. परंतु, विषयाला भावनिक रूप देऊन दिवे यांनी महापौरांवर शांत बसण्याची वेळ आणली. अर्ध्या तासाच्या भाषणानंतर त्यांनी महापौरांना छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा भेट दिली. त्या वेळी सत्ताधारी भाजपला काय करावे, सुचले नाही. शाहू महाराजांची प्रतिमा स्वीकारली नसती, तर मोठी अडचण निर्माण होणार होती. अखेरीस हतबल होत शिवसेना नेत्यांनी दिलेले छायाचित्र महापौरांनी स्वीकारले.

Web Title: nashik news politics in nashik municipal