एक जण तुरुंगात अन्‌ बाकीचे वाटेवर - प्रकाश जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नाशिक - कॉंग्रेसच्या सत्तेच्या काळात महागाई आणि भ्रष्टाचाराने लोक हैराण झाले होते. त्यामुळे महागाईतील लूट थांबवत भ्रष्टाचार संपवला असल्याचे सांगत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा नामोल्लेख न करता एक जण तुरुंगात आहेत, असे सांगितले. तसेच इतर कुणाचाही नामोल्लेख न करता बाकीचे तुरुंगाच्या वाटेवर आहेत, असे स्पष्ट करत सिंचनातील घोटाळ्याच्या प्रश्‍नाकडे त्यांनी लक्ष वेधले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असताना सिंचनाच्या 70 हजार कोटींमध्ये 40 हजार कोटींचा घोटाळा झाला. आता "ईडी'ने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे तुमची जागा तुरुंगात असून, तिथेच जाल, असेही जावडेकर यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला तीन वर्षे झाल्यानिमित्त देशभरामध्ये 15 जूनपर्यंत 900 कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्यातंर्गत महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जावडेकर बोलत होते. जावडेकर म्हणाले, की पंतप्रधानांनी सत्तेचे दलाल हद्दपार केले आहेत. केंद्र सरकारच्या चांगल्या कामकाजाबद्दल सहन होत नाही आणि सांगता येत नाही, अशी कॉंग्रेससारखी गत पाकिस्तानची झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान कुरापत काढत आहे.

Web Title: nashik news prakash javdekar talking