शाश्‍वत व्यावसायिकतेसाठी ठेवा वैश्‍विक दृष्टिकोन - प्रतापराव पवार

शाश्‍वत व्यावसायिकतेसाठी ठेवा वैश्‍विक दृष्टिकोन - प्रतापराव पवार

नाशिक - इस्त्राईलची लोकसंख्या काही लाखांत आहे. पण जगभरात इस्त्राईलमार्फत उत्पादनांची निर्यात केली जाते. भारताचा विचार केल्यास ऑटोमोबाईलसह विविध यंत्रांच्या सुट्या भागांची बाजारपेठ सहा लाख कोटींची आहे. उद्योजकतेची संधी स्वीकारत सुट्या भागांचे उत्पादन करून तरुण चांगली कमाई करू शकतात, असे प्रतिपादन "सकाळ' माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी आज येथे केले. तसेच शाश्‍वत व्यवसायात तरुणांनी वैश्‍विक दृष्टिकोन ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

के. के. वाघ शिक्षण संस्थेतील प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी श्री. पवार यांनी संवाद साधला. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्‍वस्त चांगदेवराव होळकर, समीर वाघ, सचिव डॉ. के. एस. बंदी, चांदोरी महाविद्यालयातील समिती सदस्य सुरेश भोज, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. नांदूरकर, उच्च शिक्षण समन्वयक डॉ. बी. जी. वाघ, संगणक विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. साने आदी उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, की तरुण पिढीमध्ये बौद्धिक, शारीरिक क्षमता आहेत. शिवाय भारतीय बाजारपेठेत व्यवसायाच्या संधीही उपलब्ध आहेत. या संधी स्वीकारत व्यवसाय मिळविला नाही तर दुसऱ्या कुणाच्या तरी वाट्याला ही संधी जाईल, याची जाणीव ठेवावी. आपल्यातील संपूर्ण ऊर्जेचा वापर ध्येयप्राप्तीसाठी करतो आहोत की नाही, याचा विचार तरुणांनी करावा. भविष्याचा वेध घेताना होणारे बदल आत्मसात करत व्यवसायातही परिवर्तन आणावे. अडचणींचा बागूलबुवा न करता, आपल्यातील संपूर्ण ऊर्जेचा वापर केल्यास यश निश्‍चित मिळेल. 

संवादावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना श्री. पवार यांनी उत्तरे दिली. डॉ. नांदूरकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विस्ताराची माहिती दिली. तसेच विद्यार्थिहितासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. प्रा. डॉ. प्राजक्‍ता विसपुते यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनघा कानव यांनी परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. व्ही. एम. शेवलीकर यांनी आभार मानले. 

शैक्षणिक सुविधांचे कौतुक 
संवादापूर्वी श्री. पवार यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालय, संगणक कक्ष, प्लेसमेंट विभागाला भेट दिली. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांचे त्यांनी कौतुक केले, तसेच भविष्यात विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com