‘लाभार्थी’ फुलाबाईंनी केली सरकारची पंचाईत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

नाशिक - विविध वाहिन्यांवर झळकत असलेल्या राज्य शासनाच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीमधील फुलाबाई गुलाब पवार (मोहमुख, ता. कळवण) यांना सरकारने २०१५ मध्ये शौचालय, तर २०१७ मध्ये घरकुल मंजूर केले.

नाशिक - विविध वाहिन्यांवर झळकत असलेल्या राज्य शासनाच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीमधील फुलाबाई गुलाब पवार (मोहमुख, ता. कळवण) यांना सरकारने २०१५ मध्ये शौचालय, तर २०१७ मध्ये घरकुल मंजूर केले.

एवढेच नाही, तर स्वच्छतादूत असलेल्या या महिलेची ‘मी लाभार्थी’ म्हणून जाहिरात केलीच पण त्यांना सहा महिन्यांचे मानधन दिलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा खराच आहे. या सर्व घडामोडींमुळे सरकारची चांगलीच पंचाईत झाली असून, मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमांमधून महिलांची बदनामी करणारी वक्तव्ये थांबवावीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सध्या ‘मी लाभार्थी’ या टॅगलाइनने सरकारतर्फे विविध वाहिन्यांवर जाहिराती सुरू आहेत. त्यात शौचालय बांधण्यासाठी दिल्या जाणाऱ्या १२ हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या जाहिरातीत मोहमुख (ता. कळवण) येथील फुलाबाई पवार यांचे छायाचित्र आहे. सरकारी जाहिरातीत झळकलेली फुलाबाई सध्या झोपडीत राहते. त्यांना घरकुल मिळण्यापूर्वी शौचालय मंजूर झाले, असा मुद्दा राष्ट्रवादीने उपस्थित केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी एका वाहिनीच्या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ‘मी लाभार्थी’च्या लाभार्थी महिलेला धमकावणी दिली व दबाव टाकल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज प्रत्यक्ष मोहमुख (ता. कळवण) येथील जाहिरातीत झळकलेल्या फुलाबाईंना भेटून वस्तुस्थितीची शहानिशा करून घेतली. या वेळी त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, युवती जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, कामिनी जाधव आदी होत्या. चित्रा वाघ यांनी त्या महिलेसोबत झालेल्या चर्चेचे चित्रीकरण केले असून, त्यात मी, डॉ. भारती पवार या मला याआधी कधीही भेटल्या नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांविषयी केलेले वक्तव्य बदनामीकारक असून, त्यामुळे आम्ही महिला व्यथित झालो, असल्याचे चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार उपस्थित होते.

सहा महिन्यांपासून मानधन नाही
‘मी लाभार्थी’ या जाहिरातीमधील फुलाबाई पवार या महिला स्वच्छता भारत अभियानाच्या स्वच्छतादूत म्हणून काम करतात. मोहमुख पाड्यावरील १६८ कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करण्याचे त्या काम करतात. आतापर्यंत तेथे १५० शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत; परंतु स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने त्यांना स्वच्छतादूत म्हणून काम केल्याचे मानधन अजून दिले नसल्याचे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना सांगितले. सरकारने स्वच्छतादूत महिलेलाच ‘मी लाभार्थी’ म्हणून जाहिरात केल्याची चलाखी केल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांविषयी वक्तव्य करताना कुठलीही माहिती न घेता बदनामीकारक वक्तव्य केले आहे. यावरून सत्ताधाऱ्यांनी राजकारणाची पातळी किती खाली नेली आहे, हे लक्षात येते. तसेच राज्यकर्त्यांची महिलांविषयीची मानसिकता लक्षात येते, असा आरोप सौ. वाघ यांनी केला. वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देऊ, असेही त्या म्हणाल्या. 

Web Title: nashik news pulabai government is in danger