त्र्यंबक रस्त्यावर अजगराचे दर्शन

आनंद बोरा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नाशिक - अजगर... शहरात न आढळणारा एक बिनविषारी साप. हा साप जिल्ह्याच्या टोकांच्या गावांजवळ आढळून आला आहे; पण आता तो शहराकडे येऊ लागल्याने पर्यावरणातील बदलाचे संकेतच जणू तो देऊ लागला आहे. जंगलतोड, सिमेंटच्या जंगलांमुळे त्याचे स्थलांतर होत असल्याचे सर्प अभ्यासकांचे म्हणणे असून, वन विभागाने सर्वेक्षण करून या अजगरांची माहिती घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

नाशिक - अजगर... शहरात न आढळणारा एक बिनविषारी साप. हा साप जिल्ह्याच्या टोकांच्या गावांजवळ आढळून आला आहे; पण आता तो शहराकडे येऊ लागल्याने पर्यावरणातील बदलाचे संकेतच जणू तो देऊ लागला आहे. जंगलतोड, सिमेंटच्या जंगलांमुळे त्याचे स्थलांतर होत असल्याचे सर्प अभ्यासकांचे म्हणणे असून, वन विभागाने सर्वेक्षण करून या अजगरांची माहिती घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या सापाचे वजन ८० ते १०० किलो आणि लांबी १४ ते १६ फूटही असू शकते, असा हा साप पश्‍चिम घाटात प्रामुख्याने आढळतो. पण तीन वर्षांत तो नाशिकमध्ये दिसू लागल्याने अजगराविषयी अनेक प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. वन विभागाच्या नोंदवहीत नाशिकमध्ये तीन ठिकाणी अजगर आढळून आल्याची नोंद आहे. या अजगराच्या अशा स्थलांतराने अनेक प्रश्न उभे राहत आहेत. नाशिकपासून चाळीस किलोमीटरवर तो आढळून आला आहे. तीन वर्षांपूर्वी इगतपुरीमध्ये एक जखमी आठ फुटी अजगर आढळला होता, तर दुसरा इको-एको फाउंडेशनच्या अभिजित महाले यांना तळवाडे येथील विहिरीत आढळला होता. तिसरा अजगर सर्पमित्र प्रेमकुमार ठाकूर यांनी सात वर्षांपूर्वी पकडल्याची नोंद आहे. हे तिन्ही अजगर ताब्यात (रेस्क्‍यू) घेण्यात आले होते. 

रस्ता ओलांडताना दर्शन
नाशिक- त्र्यंबक रस्त्यावरील वासाळी फाट्याजवळ सोमवारी रात्री रस्ता ओलांडताना आठ फुटी अजगर नाशिककरांनी बघितला. त्या अजगराचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्‍वर व ओझरमध्ये अजगर दिसत असल्याचे सर्पमित्र सांगतात. ही एक बाजू असली तरी दुसरी बाजूदेखील तपासणे आवश्‍यक आहे. नाशिकमध्ये प्रामाणिक सर्पमित्र काम करत असताना काही स्वयंघोषित सर्पमित्र फेसबुक, व्हॉट्‌सॲपवर कमेंट लाईकसाठी चक्क वसई, ठाणेमधून अजगर आणून घरात ठेवतात आणि त्यांचा खेळ करतात. नंतर वन विभागाच्या भीतीने जवळच्या जंगलात सोडून देतात, तर अजगरांची तस्करीही करत असल्याने त्यांच्या संवर्धनाचा प्रश्‍न निर्माण होत आहे. यासाठी वन विभागाने योग्य पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे. नाशिकमध्ये कोण खरा सर्पमित्र आणि कोण स्वयंघोषित सर्पमित्र, हे नाशिककरांना कळत नाही. त्यामुळे पकडलेला साप पुन्हा जंगलात जाईल की नाही, असा सवाल त्यांना पडतो. 

नाशिकच्या बाजूला इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, ओझर परिसरात अजगर मिळाल्याची नोंद आहे. आम्हाला दोन महिन्यांपूर्वी नळवाडे गावातील विहिरीत आठ फुटांचा अजगर मिळाला होता, त्याची नोंद आम्ही वन विभागात केली आहे. प्रचंड वृक्षतोड आणि जंगलांवरील अतिक्रमणामुळे ते शहराकडे येत असावेत, असे मला वाटते.
- अभिजित महाले, अध्यक्ष, इको एको फाउंडेशन, नाशिक

नाशिक शहराजवळ अजगर येण्याच्या घटना घडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या भागात सर्वेक्षण करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. गेल्या वर्षी ज्या स्वयंघोषित सर्पमित्रांनी फेसबुकवर गळ्यात साप ठेवून प्रदर्शन केले, त्यांना आम्ही कार्यालयात बोलावून समन्स देऊन बॉन्ड लिहून घेतले, असे प्रदर्शन किवा तस्करी करणाऱ्यांची नावे वन विभागाला कळवली तर त्यांच्यावर कारवाई करू.
- प्रशांत खैरनार, वनक्षेत्रपाल, नाशिक

Web Title: nashik news python on trambakeshwar road