पावसामुळे कालिका यात्रेत गर्दी रोडावली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नाशिक - कालिकादेवीच्या सहाव्या माळेला सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे भाविकांच्या उत्साहावर विरजन पडले. त्यामुळे यात्रोत्सवातील गर्दी रोडावली. आज देवस्थान व बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप झाले. 

नाशिक - कालिकादेवीच्या सहाव्या माळेला सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे भाविकांच्या उत्साहावर विरजन पडले. त्यामुळे यात्रोत्सवातील गर्दी रोडावली. आज देवस्थान व बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप झाले. 

नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कालिकादेवी यात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला अर्थात षष्टीचे औचित्य साधत भगवतीला काकड आरती, भजन यांसह नैवेद्य दाखविण्यात आला. आज सकाळी माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांच्या उपस्थितीत आरती झाली. दरम्यान वाढत्या पर्यावरण ऱ्हासाबाबत चिंता व्यक्त करत देवस्थान व बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे आजपासून कापडी पिशव्यांचे वाटप सुरू झाले. दसऱ्यापर्यंत वाटप सुरू राहणार आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे मुख्याधिकारी तांबट, ट्रस्टचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील, दत्ता पाटील, डॉ. प्रतापराव कोठावळे, विश्‍वस्त उपस्थित होते. आज महिलांची मोठी गर्दी होती. 

अचानक आलेल्या पावसाने धावपळ 
आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरवात झाली. पावसामुळे विक्रेत्यांसह यात्रेत आलेल्या भाविकांची धांदल उडाली. पावसामुळे अनेक विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान झाले. यात्रोत्सवातील गर्दी रोडावली होती. 

गुरुवारी रक्तदान शिबिर 
कालिका मंदिर देवस्थान व आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गुरुवारी (ता. 28) मंदिर परिसरात रक्तदान शिबिर होईल. "मविप्र'चे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमाताई पवार, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, कालिका देवस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील आदी उपस्थित राहतील.

Web Title: nashik news rain kalika devi