जुलैअखेर राज ठाकरे पुन्हा होणार सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

नाशिक - महापालिका निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने नाशिककरांवर काहीसे नाराज झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमधूनच पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. त्यासाठी जुलैअखेरचा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये पक्षसंघटना बांधणीवर अधिक भर देण्याबरोबरच पुन्हा आक्रमकतेचा पवित्रा घेतला जाणार असल्याचे मनसेच्या सूत्रांकडून समजते.

शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राज ठाकरे यांनी अन्य पक्षांत जाण्याऐवजी स्वतःचा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झंझावात राज्यभर सुरू असताना नाशिकमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले. पहिल्याच निवडणुकीत शहरातून तीन आमदार, त्यानंतर महापालिकेत पाच वर्षे सत्ता दिली. पाच वर्षांच्या कार्यकाळात स्थानिक नेत्यांना फारशी कामगिरी दाखविता आली नसली, तरी नाशिककरांनी दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी स्वतः राज ठाकरे यांनी नाशिकच्या रस्त्यावर उतरून सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून कामे उभारली. सुमारे पाचशे कोटींची विकासकामे त्यांनी स्वतःचे वजन वापरून शहरात केली आहेत. त्यात सौंदर्यीकरणाच्या कामांचा अधिक समावेश आहे. एकीकडे शहरवासीयांना नवीन प्रकल्प देत असताना, संघटनात्मक पातळीवर मनसेचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण झाले. माजी आमदारांसह निवडून आलेल्या ४० नगरसेवकांपैकी तीसहून अधिक नगरसेवकांनी अन्य पक्षांचा रस्ता धरल्याने मनसेबाबत नाशिककरांमध्ये नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली. त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीत दिसला. 

दत्तकविधानाने मुख्यमंत्री ठरले सरस
राज ठाकरे यांनी एकीकडे ‘करून दाखवलं’ म्हणताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नाशिक दत्तक घेतल्याचे विधान करून बाजी मारून गेले. एवढी कामे करूनही नाशिककरांची नाकारल्याची बाब जिव्हारी लागल्याने राज ठाकरे गेल्या चार महिन्यांपासून नाशिकमध्ये फिरकले नाहीत. आता मात्र नव्याने उभारी घेण्यासाठी ते पुन्हा नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी जुलैअखेर ते नाशिकला येऊन तीन दिवस मुक्काम करणार आहेत. यात पक्षबांधणी हा महत्त्वाचा मुद्दा राहील.

Web Title: nashik news raj thackeray