क्रूमधील सदस्य ते ‘रॅम’ विजेते... थक्क करणारा प्रवास

‘रॅम’ स्पर्धा जिंकलेले डॉ. हितेंद्र महाजन व डॉ. महेंद्र महाजन यांच्या संघात सहभागी क्रू सदस्य.
‘रॅम’ स्पर्धा जिंकलेले डॉ. हितेंद्र महाजन व डॉ. महेंद्र महाजन यांच्या संघात सहभागी क्रू सदस्य.

डॉ. हितेंद्र महाजन व डॉ. महेंद्र महाजन यांनी २०१५ मध्ये ‘रॅम’ स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय होण्याचा मान मिळविला. याच स्पर्धेदरम्यान महाजन बंधूंच्या संघात त्यांना तांत्रिक व अन्य सहाय्यतेसाठी डॉ. राजेंद्र नेहेते व डॉ. रमाकांत पाटील यांच्यासह डॉ. संदीप शेवाळे, पंकज मारलेशा यांचा सहभाग होता. अमेरिकेत तिरंगा फडकावण्याचा मान अन्‌ त्यातून मिळणारी शान काही औरच, ही तेव्हाच जाणीव झाल्याने त्यांनी रॅम स्पर्धेसाठी पात्रता पूर्ण केली अन्‌ आज ही स्पर्धा पूर्ण करून दाखवली. अखेर केवळ क्रू सदस्य असलेल्या या डॉक्‍टरांचेही अमेरिकेत तिरंगा फडकावण्याचे स्वप्न साकार झाले.

रॅम स्पर्धेत सायकलस्वाराइतकेच क्रूमधील सदस्यांना महत्त्व असते. रस्त्यावर सायकलस्वार सायकल चालवत असताना त्याला लागणाऱ्या आहारापासून अन्य विविध बाबींसाठी क्रू सदस्य नेहमी तत्पर असतात. स्पर्धा वेळेत पूर्ण करण्यासाठी नेव्हिगेशनची महत्त्वाची जबाबदारी असते. २०१५ मध्ये डॉ. महाजन बंधूंनी ही स्पर्धा पूर्ण करून इतिहास रचला. या इतिहासाचे भागीदार त्यांच्यासह त्यांचे क्रूमधील सदस्यही आहेत. त्यांच्या संघात डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. संदीप शेवाळे, पंकज मारलेशा यांचा सहभाग होता. या चौघांनी या वेळी रायडर म्हणून रॅम स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्या संघात डॉ. हितेंद्र महाजन व डॉ. महेंद्र महाजन तितक्‍याच उत्साहात सहभागी झाले.

डॉ. वर्तक, मोहिंदरसिंग यांचा अनुभवही कामी
डॉ. महाजन बंधूंच्या संघात डॉ. सुनील वर्तक व मोहिंदरसिंग यांचा सहभाग होता. आज विजयी झालेल्या सह्याद्री सायकलिस्टच्या संघातही हे दोघे डॉक्‍टर समाविष्ट झाले होते. दोघांसाठी ही दुसरी स्पर्धा असल्याने गेल्या स्पर्धेतील सहभागाचा अनुभव यंदाच्या विजयासाठी उपयोगी ठरला.

सरावासाठी कठोर मेहनत
डॉ. नेहेते व डॉ. पाटील नाशिकचे असल्याने ते कसारा घाटात, तसेच नाशिक ते मुंबई अशा अन्य विविध मार्गांवर सराव करत होते. तिकडे पंकज मारलेशा व डॉ. संदीप शेवाळे त्यांच्या पातळीवर सराव सुरू होता. एकदा तर चौघांनी मिळून स्पर्धा मार्गाप्रमाणे रंगीत तालीमही केली होती. सरावासाठी कठोर मेहनत घेतली, पण वेळोवेळी नियोजनासाठी एकत्रित येणे शक्‍य नव्हते. नाशिककर सदस्यांची आठवड्याला बैठक व्हायची. पण जे सदस्य बाहेरगावचे आहेत त्यांचीही मते महत्त्वाची असल्याने नियोजनासाठी सह्याद्री सायकलिस्टने स्मार्ट तंत्र अवलंबले. हॅंगआउट अन्‌ ब्लूजिन्स यांसारख्या मोबाईल ॲप्सवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा घडवून आणली.

असाही योगायोग...
अमेरिकेत डब्ल्यू. के. क्‍लार्कसन यांना २६ जून १८१९ मध्ये तेव्हाच्या दुचाकी सायकलसाठी पेटंट देण्यात आले होते. आज याच दिवशी अमेरिकेत भारतीयांनी सायकलवर स्वार होत तिरंगा फडकवला. हादेखील एक आनंददायी योगायोग म्हणावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com