सरासरीच्या टक्केवारीतून 'विधी'चे विद्यार्थी सुटले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

नाशिक - विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होऊनही सरासरी 50 टक्‍क्‍यांची अट पार करावी लागत होती. ती आता 40 टक्के करण्यात आली आहे. यामुळे विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण टक्केवारीत वाढ होण्याची शक्‍यता आहेच, शिवाय उत्तीर्ण होऊनही 50 टक्‍क्‍यांची सरासरी नसल्याने पुन्हा परीक्षा देण्याच्या कटकटीतून त्यांची सुटका झाली आहे.

विधी शाखेची उत्तीर्ण होण्याची वार्षिक टक्केवारी 10 ते 12 टक्केच होती. या विद्यार्थ्यांसाठी असलेली सरासरीची 50 टक्के गुणांची अट त्याला कारणीभूत होती. यासंदर्भात तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांकडून वारंवार विद्यापीठाकडे पाठपुरावा करून ही अट शिथिल करण्याची मागणी होत होती. विधी शाखेचा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाला तरी त्याची सरासरी टक्केवारी 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असेल, तर त्याला पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती.

या संदर्भात गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठांतर्गत असलेल्या विधी महाविद्यालयांचे प्राचार्य, तज्ज्ञ प्राध्यापकांची बैठक घेतली आणि त्यात याविषयीची सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या समस्येला प्राचार्य व तज्ज्ञ प्राध्यापकांनी सकारात्मक प्रतिसाद देतानाच, उत्तीर्ण होण्यासाठीची सरासरी 50 टक्के गुणांची अट शिथिल करण्यास मान्यता दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच नव्या नियमाचा लाभ मिळणार आहे.

Web Title: nashik news ritual branch student percentage