यांत्रिकी झाडूने रस्ते होणार चकाचक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

नाशिक - शहरात नवीन तयार केलेल्या काँक्रिट रस्त्यांसह बाजारपेठ, उपनगरांमधील महत्त्वाच्या रस्त्यांवरील स्वच्छता यांत्रिकी झाडूने शक्‍य आहे. तत्काळ यांत्रिकी झाडू खरेदी करण्यापेक्षा प्रायोगिक तत्त्वावर यंत्रणा राबविण्याचा विचार आहे. तत्पूर्वी, इतर शहरांत यांत्रिकी झाडूचे कामकाज कसे चालते, त्या महापालिका यशस्वी झाल्या का?, याचा अभ्यास करूनच निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये यांत्रिकी झाडूची पाहणी आज महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी केली. औरंगाबादच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे झाडलोट करण्यास उशीर व्हायचा. शिवाय गोळा झालेला कचरा व धूळ उचलली जात नव्हती. त्यामुळे २०१३ मध्ये यांत्रिकी झाडू खरेदीचा निर्णय झाला. जुलै २०१५ पासून या माध्यमातून व्हीआयपी रस्ते रात्री स्वच्छ केले जाताहेत. आतापर्यंत अडीच हजार किलोमीटरचे रस्ते स्वच्छ झाले आहेत. त्याद्वारे तीन हजार टन धूळ गोळा झाली. रोज सरासरी सहा ते आठ टन धूळ किंवा माती उचलली जाते. यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून दहा स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम एकावेळी व कमी वेळेत होते. शहरातील सपाट रस्त्यांवरच यांत्रिकी झाडू चालविला जातो.

आरोग्य समितीला डावलले
महापालिकेत नुकतीच आरोग्य समितीची स्थापना झाली. समितीला घटनात्मक अधिकारावरून विरोधकांकडून टीका होत असताना भाजपकडून जोरदार समर्थन केले जात आहे. यांत्रिकी झाडू पाहण्यासाठी झालेल्या दौऱ्यात नेमके ज्या विभागाचा अधिक संबंध आहे, त्याच समितीला डावलल्याने सत्ताधारी भाजपकडूनच अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आरोग्य व वैद्यकीय समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांना अभ्यासदौऱ्यासाठी निमंत्रित करणे अपेक्षित होते, पण त्यांनाच डावलल्याने भाजपमधील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अद्याप निर्णय नाही - महापौर
महापौर भानसी यांनी यांत्रिकी झाडू खरेदीचा निर्णय झाला नसल्याचे सांगितले. खरेदीची वेळ आल्यास धोरणात्मक निर्णय म्हणून महासभेवर ठेवला जाईल. प्रायोगिक तत्त्वावर यंत्रणा राबविता येईल का, इतर शहरांत यांत्रिकी झाडूची परिस्थिती काय, याचीही चाचपणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: nashik news road clean by mechanical broom