रस्तेविकासावर पुन्हा वीस कोटींची उधळण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यात रिंगरोड विकासाची झालेली कामे त्यानंतर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात 192 कोटींच्या रस्ते कामांना मिळालेली मान्यता व भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात पुन्हा 257 कोटींच्या रस्ते कामांच्या निविदा निघाल्या असताना आता पुन्हा एकदा रस्तेविकासावर वीस कोटींची उधळण होणार आहे. 

स्थायी समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे विकासकामे मंजुरीचे विषय मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. हे विकासकामांचे विषय मंजूर होत असताना फक्त रस्तेविकासाकडेच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सिंहस्थात नाशिक शहरातील सुमारे 90 किलोमीटरचे रिंगरोड तयार करण्यात आले. त्यासाठी 460 कोटी रुपये खर्च झाला. रिंगरोड होत नाही तोच निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मनसेच्या सत्ताकाळात पुन्हा रस्ते कामासाठी 192 कोटींची कामे हाती घेण्यात आली. कॉलनी अंतर्गत रस्ते या निधीतून तयार करण्याचे घोषित झाले. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपलाही रस्ते कामांची गरज भासली. जानेवारीत 257 कोटींच्या कामांच्या निविदा जाहीर झाल्या. 

निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना स्थायी समितीवर आणखी 19 कोटी 12 लाखांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. महापालिकेत रस्त्याची कामे झाल्यानंतर तीन वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडे असते. महापालिकेत तीन वर्षांपूर्वी केलेल्या रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर झाल्याने रस्त्यांची कामे वादात सापडण्याची शक्‍यता आहे. 

विभागनिहाय रस्ते दुरुस्तीचा खर्च 
पंचवटी- दोन कोटी 96 लाख 
सातपूर- चार कोटी 17 लाख 
पूर्व- दोन कोटी 98 लाख 
सिडको- तीन कोटी 49 लाख 
पश्‍चिम- दोन कोटी पाच लाख 
नाशिक रोड -तीन कोटी 45 लाख 
--------------------------------- 
एकूण - 19 कोटी 12 लाख 

Web Title: nashik news road development