स्थलांतरित "रोहित'ला पक्षीमित्रांकडून नवी भरारी 

आनंद बोरा
बुधवार, 17 जानेवारी 2018

नाशिक - पक्ष्यांच्या दुनियेतील सुंदरशा स्थलांतरित रोहितला पक्षीमित्रांनी नवी भरारी दिलीय. रोहितला लासलगावमधील कांद्याच्या शेतातून "रेस्क्‍यू' करण्यात आले असून, पक्षीमित्र तीन आठवड्यांपासून त्याच्या सेवेत आहेत. 

नाशिक - पक्ष्यांच्या दुनियेतील सुंदरशा स्थलांतरित रोहितला पक्षीमित्रांनी नवी भरारी दिलीय. रोहितला लासलगावमधील कांद्याच्या शेतातून "रेस्क्‍यू' करण्यात आले असून, पक्षीमित्र तीन आठवड्यांपासून त्याच्या सेवेत आहेत. 

नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य, वाघाड आणि गंगापूर धरणावर रोहित पक्षी हिवाळ्यात काही दिवसांसाठी मुक्कामी येतात. देखणा पक्षी लासलगावमधील सचिन नागरे यांच्या कांद्याच्या शेतात जखमी अवस्थेत पडला असल्याचा नाशिकचे पक्षीमित्र उमेश नागरे यांना दूरध्वनीवरून निरोप मिळाला. नागरेंनी ही माहिती अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांना कळविली. दोघेही लासलगावमध्ये पोचले. पाणपक्ष्याला संरक्षित दर्जा असल्याने त्याला नाशिकला आणले गेले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय महाजन यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्या वेळी तो अशक्त असून, कुठेतरी आदळून जखमी झाल्याचे निदानातून स्पष्ट झाले. नाजूक रोहितला सांभाळणे अवघड असल्याने त्याला सांभाळण्याची जबाबदारी उमेश आणि त्यांचे सहकारी पक्षीमित्र मनोज वाघमारे यांनी स्वीकारली. तशी नोंद वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करून घेतली. 

रोहितला सुरवातीला दिव्याद्वारे ऊर्जा दिली गेली. दररोज मसाज आणि इतर उपचार करून त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अलगी, सिरॅमिक, प्रोटिन, मासे यांचे मिश्रण करून हे खाद्य नळीतून दररोज दिले गेले. त्याच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली. तो बसायला लागला. तीन आठवड्यांनंतर तो आता उभा राहण्याचा प्रयत्न करू लागलाय. त्याला पुन्हा त्याच्या  दुनियेत नेण्यासाठी पक्षीमित्रांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला नाशिकजवळील पाणथळ जागेवर नेऊन नैसर्गिक खाद्य खाण्यासाठी शिकविले जाते. निसर्गाचे नियम शिकून त्याने स्वतः उडून जाण्याचा प्रयत्न हे पक्षीमित्र करत आहेत. विशेष म्हणजे, रोहितला उभारी देण्यासाठीचा सारा खर्च पक्षीमित्र करताहेत. 

लासलगावमधून रोहित पक्षी आणला असताना त्याची अवस्था बिकट होती. आम्ही त्याचा दररोज व्यायाम करून घेत आहोत. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषध दिली जात आहेत. तसेच नैसर्गिक सवयी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
-उमेश नागरे, पक्षीमित्र 

रोहित पक्षी पाणथळ भागात राहत असल्याने मुख्यतः शेवाळ खातो. त्यामुळे त्याची काळजी घेणे खूपच अवघड होते. पण त्याने उत्तम प्रतिसाद दिल्याने आता काही दिवसांत तो उडून जाईल असे वाटते. 
-डॉ. संजय महाजन, पशुवैद्यकीय अधिकारी, नाशिक 

रोहित पक्षी जखमी अवस्थेत असल्याने त्याला आम्ही नाशिकला आणले. वैद्यकीय उपचार करून पुन्हा पूर्ण बरा झाल्यावर नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात सोडून देण्यात येणार आहे. 
-भगवान ढाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिक 

Web Title: nashik news rohit bird