सावधान... नाशिक वाढतंय उंच इमारतींनी अन्‌ रस्ते वाढताहेत फुटाफुटानं! 

विक्रांत मते
बुधवार, 17 जानेवारी 2018

नाशिक -  दक्षिणकाशी.. गुलशनाबाद.. यात्रेकरूंचं.. द्राक्ष-कांद्याचं आणि आता वाइन कॅपिटल, शैक्षणिक हब अशी बिरुदावली मिरविणारं "नाशिक शहर'... हे शहर बदलतंय, स्मार्ट होतंय आणि हो एवढंच नव्हे, तर शहर वाढतंय ते उंचच उंच इमारतींबरोबरच रस्त्याच्या अंगानं... स्मार्टसिटीकडे वाटचाल करणारं नाशिक आता सर्वच क्षेत्रांना खुणावू लागलं आहे. हे खरं असलं तरी मातीचे भरावही टाकले जात आहेत. रस्त्याची उंचीही अडीच ते तीन फुटांनी वाढल्यानं पन्नास वर्षांपूर्वी बांधलेली घरं आज खड्ड्यात गेलेली दिसतात. परिणामी शहराला केव्हा आणि कधी पुराच्या पाण्याचा तडाखा बसेल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. 

आपलं शहर सर्वच बाबतीत स्मार्ट असावं, असं त्या शहरात राहणाऱ्या प्रत्येकच नागरिकाला वाटतं, त्यात गैरही काही नाही, कराच्या रूपानं भरमसाट पैसे घेणाऱ्या महापालिकेसारख्या स्वायत्त संस्थांनी पैशाचा योग्य विनियोग करून शहर स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी माफक अपेक्षा असते. पण त्यासाठी ठोस नियोजन, आराखडाही असायला हवा, असं सर्वांनाच वाटतं. नाशिक शहराच्या बाबतीतही गैर काहीच नाही. नाशिकच्या बाबतीत बोलायचं झाल्यास शहर एकाच अंगानं वाढत आहे. ते वाढणं शहराच्या दृष्टीनं घातक मानलं जातं. 

अडीच फुटानं वाढली उंची... 
शहरातील जमीन उंच होण्यामागे महापालिकेमार्फत तयार केले जाणारे रस्ते कारणीभूत ठरत आहेत. रस्ता तयार करताना जेवढा थर चढवायचा आहे तेवढाच थर आधुनिक पद्धतीनं कापून त्यातून बाहेर पडलेलं मटेरिअल पुन्हा वापरात आणावं लागतं; परंतु थर न कापता खर्च वाचवण्यासाठी त्यावरच डांबरमिश्रित थर टाकला जात असल्यानं रस्त्याची उंची वाढताना भौगोलिक विषयांच्या तज्ज्ञांच्या पाहणीतून आढळून आलं आहे. गेल्या तीस ते चाळीस वर्षांचा विचार करता अडीच ते तीन फुटांनी रस्त्यांची उंची वाढली आहे. 

उंचसखल भागामुळे उभा राहिला प्रश्‍न 
नाशिक शहराचा विकास झपाट्यानं होत आहे. देशात वेगानं वाढणाऱ्या शहरांमध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकचं नाव घेतलं जातं. विकासाच्या दृष्टीनं ही बाब स्वागतार्ह असली, तरी विकास होत असताना शहरासमोर अनेक नैसर्गिक समस्या निर्माण होत आहेत. सर्वांत महत्त्वाची समस्या म्हणजे शहराची उंची वाढत आहे. अनेक भागांत नव्या इमारती, बंगले व रस्त्यांची कामं सुरू आहेत. इमारती उभारत असताना मोठ्या प्रमाणात माती व मुरमाचा भराव टाकण्याच प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे जोत्या (प्लिंथ)ची उंची रस्त्याच्या बरोबरीनं आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातून काही भागातील घरं खड्ड्यात गेली आहेत, तर काही भाग उंचसखल झाला. गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार वाढत असताना मोठ्या प्रमाणात मातीचे भराव टाकले जात आहेत. 

पुराची भीती
नैसर्गिक नियमानुसार जमीन समतल असते. पण रस्त्यावर थर चढवले जात असल्यानं तसेच इमारतींच्या भोवतीदेखील मातीचे भराव टाकले जात असल्यानं शहरातील बहुतांश भागात जमीन असमतोल होऊन चढ-उताराचं प्रमाण वाढलं आहे. पावसाचं पाणी साचल्यानंतर उतार मिळत नसल्यानं घरांच्या आजूबाजूला पाणी साचण्याचं प्रमाण वाढलं आहे. भराव कमी न झाल्यास तसेच रस्त्यांची उंची सातत्यानं वाढती राहिल्यास भविष्यात नैसर्गिक आपत्ती वाढण्याची भीती भूगोल विषयाचे तज्ज्ञ प्रा. दीपक ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: nashik news sakal development