भक्तिधाममध्ये रविवारी कलेची आराधना

भक्तिधाममध्ये रविवारी कलेची आराधना

नाशिक - दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी राबविण्यात येणारा ‘सकाळ-कलांगण’ उपक्रम रविवारी (ता. २८) भक्तिधाममध्ये बहरणार आहे. भक्तिधाममध्ये भगवान पशुपतिनाथ प्रमुख असून, नर नारायण, राम-सीता-लक्ष्मण, विठ्ठल-रखूमाई, दुर्गामाता, भगवान विष्णू यांचे विराट स्वरूप या संगमरवरावर कोरलेल्या मूर्ती आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना आरसे लावल्याने एका मूर्तीच्या अनेक प्रतिमा पाहावयास मिळतात. 

‘सकाळ-कलांगण’मध्ये शहरातील मान्यवर कलाकारांबरोबर कलारसिकही सहभागी होऊन कलेचा आनंद मनमुराद लुटतात. नाशिक स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत असताना कला समृद्ध व्हावी, धकाधकीच्या जीवनात कलेपासून आनंद मिळावा, ताणतणावापासून विरंगुळा मिळावा या हेतूने हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. दीड वर्षापासून हा उपक्रम सुरू असून, त्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतीही अट नाही, किंवा शुल्क आकारले जात नाही. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी शहरातील एका ठिकाणी सर्व कलाकार एकत्र येऊन कला सादर करतात. सुप्त कलागुणांना वाव देतात. त्यामुळे विविध क्षेत्रांतील यशस्वी कलाकारांना भेटण्याची, बोलण्याची, त्यांची कला पाहण्याची उत्तम संधी उपलब्ध होते. 

‘सकाळ-कलांगण’चा प्रारंभ दीड वर्षापूर्वी तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले, तत्कालीन महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा विजयश्री चुंभळे, महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर वारली चित्रकलेच्या ज्येष्ठ अभ्यासक आदिती भिडे व ज्येष्ठ विधिज्ञ अविनाश भिडे, वनाधिपती विनायकदादा पाटील, ‘मविप्र’ सरचिटणीस नीलिमाताई पवार, अभिनेते दीपक करंजीकर, अभिनेत्री विद्या करंजीकर, क. का. वाघ परफॉर्मिंग आर्टस कॉलेजचे प्राचार्य मकरंद हिंगणे, महापौर रंजना भानसी, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक श्रीकांत घारपुरे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, काष्ठशिल्पकार प्रकाश तुपे, बासरीवादक मोहन उपासनी, व्यंग्यचित्रकार ज्ञानेश बेलेकर, चित्रकार राजेश व प्रफुल्ल सावंत, संगीतकार व गायिका शुभदा तांबट, तबला अकादमीचे नितीन पवार, संगीतकार सुभाष दसककर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, डॉ. उदय खरोटे, अभिनेता चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री गिरिजा जोशी यांनी हजेरी लावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com