ऐतिहासिक नारोशंकर मंदिरात बहरले "सकाळ-कलांगण' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

नाशिक - खळाळत वाहणाऱ्या गोदावरीच्या काठावरील ऐतिहासिक नारोशंकराचे मंदिर कलाकृतीने नटलेले आहे. आज रविवारच्या रम्य सकाळी नारोशंकराच्या मंदिरात ठाण मांडत कलावंतांनी मंदिराचे, गोदाकाठचे सौंदर्य रेखाटले. रंगरेषांचा शिडकाव करत चित्रकारांनी नारोशंकर मंदिराच्या विविध छटा अन्‌ गोदाकाठचे नयनरम्य दृष्य कॅनव्हासवर उतरविले. अन्‌ त्याला सुमधुर गायन अन्‌ कवितांची जोड मिळाल्यानं वातावरण आणखीच उत्साहवर्धक बनले होते. औचित्य होते "सकाळ'तर्फे आयोजित "सकाळ-कलांगण' या उपक्रमाचे. 

या कार्यक्रमात "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, आधार आश्रमाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीकांत पूर्णपात्रे, दीपक मंडळाचे प्रमुख सुरेश गायधनी, प्रसिद्ध गायिका गीता माळी, नारोशंकर मंदिराचे विश्‍वस्त सदाशिवराव राजेबहाद्दर, चंद्रकांतराव राजेबहाद्दर, निशिकांतराव राजेबहाद्दर, कवयित्री रेखा भंडारे, डॉ.मयुरी बच्छाव आदी उपस्थित होते. 

सकाळी रिमझिम पावसाच्या साथीने कलावंतांनी गोदाकाठ रेखाटायला सुरवात केली. कुणी मंदिराबाहेर दिसणारे गोदामाईचे सौंदर्य तर कुणी मंदिराच्या कळसावरील शिल्पकृती आपल्या कॅनव्हासवर उतरविण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत यांनीही यावेळी चित्र रेखाटतांना लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. 

औपचारीक उद्‌घाटन कार्यक्रमात सुरेश गायधनी यांनी प्रात्येक्षिकासह अभिनयाची बारकावे उपस्थितांसमोर सादर केले. तर डॉ.श्रीकांत पूर्णपात्रे यांनी आपल्या शैलीत कविता सादर करत सर्वांची दाद मिळविली. गायिका गीता माळी यांनी गायिलेल्या सुमधुर गाण्यांनी साऱ्यांचा उत्साह आणखी वाढला. तर निशिकांतराव राजेबहाद्दर यांनी नारोशंकर मंदिराचा इतिहास उपस्थितांसमोर उलगडला. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी गवळण सादर केली. 

Web Title: nashik news sakal Kalangan