शेतकऱ्यांच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड मैदानात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नाशिक - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने फक्त चर्चेवरच न थांबता कृती करावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेड मैदानात उतरणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी आज नाशिकमध्ये जाहीर केले. सरकारने मागण्या मान्य न केल्यास सरकारचे आमदार, खासदार व मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा दिला.

बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा चालवाव्यात, सरकारने विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी त्यांनी केली.

शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिकमध्ये समन्वय समितीच्या बैठकीसाठी आखरे आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, 'राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण स्वयंघोषित कोअर कमिटीसोबत मुख्यमंत्र्यांनी बंद खोलीत चर्चा करून बंद मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी त्यास दाद न देता संप सुरूच ठेवल्याने शासनाचे प्रयत्न हाणून पडले. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. आता चर्चेपेक्षा कृती करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावे, बियाणे, खते, औषधे व पेरणीचा खर्च यांसारख्या समस्या शेतकऱ्यांसमोर आहेत. पहिले कर्ज माफ झाल्याशिवाय नवीन कर्ज मिळत नाही, त्यामुळे नवीन कर्जाची प्रकरणे कशी करायची, असा सवाल उपस्थित करताना शेतकऱ्यांचे प्रश्‍न तत्काळ न सोडविल्यास संभाजी ब्रिगेडतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटन सचिव डॉ. संदीप कडलग, जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, सांगलीचे सुयोग औंधकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा माधुरी भदाणे आदी उपस्थित होते.

Web Title: nashik news sambhaji brigade involve in farmer agitation