'समृद्धी'विरोधात फास अन्‌ सामूहिक सरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

शिवडे, पाथरेतील बाधित शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका

शिवडे, पाथरेतील बाधित शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका
नाशिक - कोणत्याही परिस्थितीत नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जमिनी द्यायच्या नाहीत. सक्तीचे भूसंपादन केल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा देत बाधित शेतकऱ्यांनी शिवडे तसेच पाथरे (ता. सिन्नर) या गावात ठिकठिकाणी फास आणि सामूहिक सरण रचले आहे. पाथरे गावात आज शेतकऱ्यांनी दरपत्रकाची होळी केली.

इगतपुरी व सिन्नर या तालुक्‍यांतील 49 गावांतील जमिनी जाणार असलेल्या या भागातून घोटी-सिन्नर महामार्ग असूनही पुन्हा स्वतंत्र समृद्धी मार्गासाठी जमिनी घेतल्या जात असल्याने शेतकऱ्यांना जमिनीच द्यायच्या नाहीत तर मोजणी कशाला, अशी भूमिका घेत मोजणीला विरोध केला होता. अनेक गावांनी अर्टी-शर्तींवर मोजणी करू दिली. त्यानंतर शेतकरी संपामुळे थंडावलेल्या कामाला पुन्हा एकदा वेग आला आहे. प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी वाटाघाटीने जमिनी खरेदीसाठी भाव जाहीर केले. शासनाच्या दराला प्रतिसाद मिळण्याऐवजी विरोधाची धार सुरू झाल्याचे पुढे येते आहे. आज पाथरे गावात शेतकऱ्यांनी दरपत्रकाची होळी करत वाटाघाटीने जमिनी खरेदीच्या निर्णयाचा निषेध केला.

महामार्गासाठी 49 गावांच्या जमिनी जात असल्या तरी त्यापैकी सर्वाधिक नुकसान होणाऱ्या शिवडे (ता. सिन्नर) गावातून तीव्र विरोध झाला. शिवडेतील ग्रामस्थांनी मोजणीही करू दिली नाही. दर जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दरपत्रकाची होळी करत विरोधाचा सूर आळविला. गावातील विरोधाची धार अद्यापही कमी झालेली नाही. सक्तीने भूसंपादन सुरू झाल्यास त्याविरोधात बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी आंदोलनाची रणनीती ठरविली आहे. अनेकांनी त्यांच्या विहिरी, शेतातील झाडांवर फास बांधून ठेवले आहेत, तर काही ठिकाणी चिता रचून ठेवल्या आहेत.

आज एल्गार सभा
"समृद्धी'बाधित गावांतील शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीची उद्या (ता. 10) दुपारी बाराला एल्गार सभा होणार आहे. मुंबई नाका परिसरातील तुपसाखरे लॉन्समध्ये ही एल्गार सभा होणार आहे. बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी प्रशासनाकडून भूसंपादन कायद्याचे उल्लंघन करून दहशत सुरू असल्याचा समितीचा आरोप आहे. त्याविरोधात समितीचे पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत.

Web Title: nashik news samrudding highway oppose by farmer