सप्तशृंगगडावर सत्तर हजार भाविक लीन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

वणी - त्रिगुणात्मक स्वरूपी आदिशक्ती सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवातील सहाव्या माळेस सुमारे 70 हजारांवर भाविकांनी मंगळवारच्या मंगलमय वातावरणात मनोभावे पूजन करीत दर्शन घेतले. 

वणी - त्रिगुणात्मक स्वरूपी आदिशक्ती सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवातील सहाव्या माळेस सुमारे 70 हजारांवर भाविकांनी मंगळवारच्या मंगलमय वातावरणात मनोभावे पूजन करीत दर्शन घेतले. 

नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी मंगळवार आल्याने व मंगळवार हा देवीचा वार समजला जात असल्यामुळे सकाळी सातपासूनच गडावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी सातला देवीच्या पंचामृत महापूजेस प्रारंभ होताच भाविकांची गर्दीही वाढत गेली. आजची पंचामृत महापूजा व आरती भाविक सतीश मोहळे व ऍड. मधुकर पुरकर यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत केली. दरम्यान, आज दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राचे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, न्यासाचे विश्‍वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनीही सपत्नीक देवीची पूजा करीत दर्शन घेतले. दरम्यान, अाज (ता. 27) सप्तमी हा नवरात्रोत्सवातील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस मानला जात असल्याने या दिवशी नाशिक जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, नगर व गुजरात या राज्यांतील हजारो भाविक पदयात्रेने सप्तमीच्या पूर्वसंध्येस गडावर दाखल झाले आहेत. हजारो भाविक सप्तशृंगगडाकडे आई भगवतीचा जयघोष करीत मार्गक्रमण करीत आहेत. यात महिलांचा मोठा सहभाग असून, वणी-नाशिक रस्ता पदयात्रेकरूंच्या गर्दीने फुलला आहे. रस्ता ठिकठिकाणी उखडल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्याने या मार्गावरील वाहनांबरोबरच पदयात्रेकरूंनाही त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: nashik news Saptashrangad