आमच्या बागायती जमिनी वाचवा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

"समृद्धी'बाधित शेतकऱ्यांचे साकडे; मंत्रालयात बैठकीचे आश्‍वासन

"समृद्धी'बाधित शेतकऱ्यांचे साकडे; मंत्रालयात बैठकीचे आश्‍वासन
नाशिक - "समृद्धी'बाधित शेतकऱ्यांबरोबरच्या भेटीत आज मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना चर्चेसाठी थेट मंत्रालयात येण्याचे आमंत्रणही दिले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर बाधित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. "साहेब, आमच्या बागायती जमिनी वाचवा', असे साकडे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना घातले.

नाशिकच्या मेळा बस स्थानकातील बसपोर्टच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री सभास्थळी येण्याच्या काही मिनिटे आधीच "समृद्धी'बाधित शिवडे व घोरवडच्या शेतकऱ्यांनी हजेरी लावली. मात्र, त्यांना मेळा बस स्थानकाबाहेरच अडविताना पोलिसांची चांगली धावपळ उडाली.

बसपोर्टचे भूमिपूजन केल्यानंतर "समृद्धी'बाधित मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी काउंटर कार्यालयाजवळ आले. त्या वेळी बाधित शेतकऱ्यांनी निवेदन दिले आणि "साहेब, आमच्या बागायती जमिनी वाचवा. अधिकारी आपणास खोटी माहिती पुरवत असून, तुम्हीच एकदा स्वतः पाहणी करावी', अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मुंबईला मंत्रालयात येण्याचे सांगत, बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.

रक्‍ताने लिहिलेले निवेदन
समृद्धी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्याने स्वतः रक्ताने लिहिलेले निवेदनही मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यासाठी आणले होते; परंतु पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून निवेदने काढून घेतली. त्यातील हे निवेदन काढून घेत ते पोलिसांनी जप्त केले.

Web Title: nashik news Save our horticultural lands!