शरद पवारांचा सरकारवर "हल्लाबोल'; संघर्षयात्रेची समारोप सभा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

नाशिक  - बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 10) येथे दिला, तसेच आता बस्स झालं, असे खडे बोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी व गरिबांना सन्मानाने जगता यावे यासाठी संधी मिळताच सरकारला खड्यासारखे बाजूला करत परिवर्तन करण्याचे आवाहन केले. 

नाशिक  - बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 10) येथे दिला, तसेच आता बस्स झालं, असे खडे बोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी व गरिबांना सन्मानाने जगता यावे यासाठी संधी मिळताच सरकारला खड्यासारखे बाजूला करत परिवर्तन करण्याचे आवाहन केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारविरोधात सुरू केलेल्या उत्तर महाराष्ट्रामधील हल्लाबोल संघर्षयात्रेचा समारोप शनिवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील सभेने झाला, त्या वेळी श्री. पवार शनिवारी बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते. 

शेतकरी कुटुंबांतील कर्त्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे, याकडे लक्ष वेधत श्री. पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात देशात वर्षाला 12 हजार शेतकरी आत्महत्या करतात, अशी माहिती दिल्याचे सांगितले. देशातील आत्महत्यादर वाढत असून, हे प्रमाण 42 टक्‍क्‍यांपर्यंत पोचल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की खानदेशातील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नीला आत्महत्येचा विचार करावा लागत आहे, हे दुर्दैवी आहे. ही सारी परिस्थिती पाहिल्यावर शेतकरी अस्वस्थ झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुर्लक्षित करणाऱ्यांना सत्तेवरून दूर केल्याशिवाय राष्ट्रवादीचा हल्लाबोल स्वस्थ बसणार नाही. 

बेरोजगारीचा भस्मासुर वाढतोय 
नोकऱ्यांमधील जागा रिक्त आहेत. त्या भरल्या जात नाहीत. नवीन कारखानदारी येत नाही. हाताला काम मिळत नसल्याने बेरोजगारीचा भस्मासुर वाढत चालला आहे. त्यामुळे आता शेतीत एकाला ठेवून दुसऱ्याला धंद्यात ठेवावे लागेल, असे सांगून श्री. पवार म्हणाले, की ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, भुईमूग, तीळ, गव्हाचे उत्पादन घटले. दुसरीकडे, शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची भांडवली गुंतवणूक करण्याची ताकद राहिली नाही. मात्र, दिल्लीत कर्जमाफीची तयारी नसल्याने शंभर टक्के कर्जमाफी करण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांची नाही. कर्जमाफी पुरेशी नसताना डोक्‍यावरील ओझ्याची नोंद घेण्यास सांगण्यात आले आहे. नोटाबंदीनंतर सहकारी बॅंकांमधील नोटा बदलून देण्याऐवजी तोटा म्हणून सहन करण्याचे परिपत्रक काढले आहे. 

गुळवे अन्‌ मंडाले राष्ट्रवादीत 
शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार यांनी प्रास्ताविक केले. आमदार जयवंत जाधव यांचेही भाषण झाले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप गुळवे, कॉंग्रेसचे लक्ष्मण मंडाले, दत्तात्रय माळोदे, संगीता राऊत, नीलेश जाधव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील आई-वडिलांनी आत्महत्या केलेल्या आकांक्षा दिनेश पवार या चिमुकलीने "शिवरायांचं राज्य आहे काय', असा प्रश्‍न उपस्थित करत तिने शेतकऱ्यांना वाचविण्याची आर्त हाक दिली. आमदार हेमंत टकले यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी सभा नाशिककरांपर्यंत पोचू नये म्हणून सरकारने वीजपुरवठा खंडित केल्याची टीका केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

"क्रांतीनगरीतील क्रांतिवीर' 
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबून ठेवल्याचा खेद राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नोंदवला. श्री. मलिक यांनी, सरकार जास्त काळ चालणार नाही या भीतीपोटी सरकारने श्री. भुजबळ यांना तुरुंगात ठेवल्याचे सांगितले. त्यांनी श्री. भुजबळांना न्यायालयात न्याय मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. योद्धे भुजबळ तुरुंगातून लढताहेत अन्‌ महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी सरकार गुजरात देण्यास तयार असल्याची टीका श्री. आव्हाड यांनी केली. श्री. भुजबळ यांच्या प्रकृतीविषयी पक्षाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र त्यांनी वाचून दाखविले. खासदार सुळे यांनी भुजबळांच्या आठवणींना उजाळा दिला. "क्रांतीनगरीतील क्रांतिवीर' असा भुजबळांचा उल्लेख करत श्री. मुंडे यांनी भाजपवर भुजबळांना डांबून ठेवल्याचे टीकास्त्र सोडले. श्री. तटकरे यांनी भुजबळांची आठवण प्रकर्षाने येत असल्याचे सांगितले. भुजबळांनी नाशिकचा विकास सुरू केला आणि आताच्या मंत्र्यांनी इथल्या बोटी, क्रीडा प्रबोधिनी पळवून नेल्याची टीका श्री. मुंडे यांनी केली. 

किसान सभेच्या आंदोलनाला पाठिंबा 
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर विधानभवनाला सोमवारी (ता. 12) घेराव घालण्यासाठी नाशिकमधून रवाना झालेल्या किसान सभेच्या "लॉंग मार्च'ला राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी, शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहतील. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने "लॉंग मार्च'मध्ये मला सहभागी होत येत नसल्याचे स्पष्ट केले. श्री. तटकरे यांनीही कम्युनिस्टांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा राहील, अशी घोषणा केली. 

भाडोत्री, उसना दत्तक बाप नकोय! 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले म्हटल्यावर काय बदल झाला?, नवीन काय बघायला मिळते हे पाहत होतो?, अशी सुरवात करत श्री. पवार यांनी दत्तक बापाने पोरांकडे ढुंकून पाहिले नसल्याची टीका केली. भाडोत्री, उसना दत्तक बाप नकोय. घरातील वयस्कर असला, तरी तो बाप हवाय. तो आपल्या हिताची जपणूक करेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, श्री. आव्हाड यांनी भुजबळांना तुरुंगात डांबून ठेवल्याने ओबीसींचे नुकसान झाले असून, ते आता असते, तर सरकारला पळविले असते, असे सांगताच, उपस्थितांमधून उत्स्फूर्तपणे म्हणूनच डांबून ठेवल्याची प्रतिक्रिया उंच स्वरात व्यक्त झाली. 

कोण काय म्हणाले... 

* चित्रा वाघ - "कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' हे विचारण्याची वेळ आली आहे. गायीबरोबर राज्यातील ताईंच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

* जितेंद्र आव्हाड - नाशिकमधील परिवर्तनवादी, विवेकवादी चळवळीतील कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत. परिवर्तनवादी चळवळ दडपण्याचा पोलिसांच्या माध्यमातून सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, चळवळ कायम राहावी म्हणून आम्ही कार्यकर्त्यांसोबत राहू. शिवाय लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म स्थापण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा राहील. पक्षाध्यक्षांनी लिंगायत समाजाच्या मागणीसंबंधी राष्ट्रपतींची भेट घेण्याचे ठरविले आहे. 

* खासदार सुप्रिया सुळे - महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न सन्मान मिळावा, अशी मागणी संसदेत केली. राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. सरकारने आता मराठी शाळा बंद करण्याचे धोरण स्वीकारले असले, तरीही अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेतर्फे शाळा बंद न करण्याचे ठरविले आहे. पक्षातर्फे एका विद्यार्थ्यासाठी शाळा चालविली पाहिजे, अशी मागणी विधानसभेत लावून धरण्यात येईल. (स्व.) नेते आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले, पण राज्यातील मंत्री दारू उत्पादनाला महिलांचे नाव द्या, असे सांगतात. त्याविरोधात प्रेरणा बलकवडे यांनी आंदोलन केल्यावर माफी मागितली जाते. पण मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. 

* धनंजय मुंडे - रोजगाराचा अर्थ पंतप्रधान भजी तळणे असा लावत असतील, तर हा तरुणाईचा अपमान आहे. त्याविरोधात राष्ट्रवादीची लढाई आहे. कर्जमाफीतून शेतकऱ्यांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा सरकारने अपमान केला आहे. जलयुक्त, सिंचन योजना झाल्या, असा दावा केला जात असेल, तर रब्बीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा क्षेत्र कसे कमी झाले, हा प्रश्‍न आहे. सरकार आकड्यांची "जगलरी' करत असल्याचे पाहून पूर्वी मटका खेळत होते का?, अशी शंका वाटते. 

* सुनील तटकरे - सरसकट कर्जमाफी, गुजरातला पाणी पळविणे, रोजगारातील घट याविरोधात राष्ट्रवादीचा संघर्ष सुरू राहील. 

* प्रफुल्ल पटेल - आताच्या कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना "राधे राधे' केले, तसेच सरकारने शिष्यवृत्ती, रोजगाराचा प्रश्‍न जटिल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news sharad pawar halla bol agitation NCP